Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanshi : भारतीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी हे नाव मागील दोन वर्षांपासून चर्चांमध्ये अग्रस्थानी आहे. अवघ्या १५ व्या वर्षी त्याने अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष त्याच्या कामगिरीकडे असते. मात्र, मागील काही दिवस टीम इंडियातील त्याला मिळणाऱ्या संधीचीही तेवढीच चर्चा होते. आता भारताचा टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला संधी का मिळत नाही, याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे.
भारताचा टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला भारतीय संघातील संधीबाबत म्हटले की, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतही वैभवला कदाचित बेंचवरच बसावे लागेल. त्याला संधीची वाट पाहावी लागेल. सर्वप्रथम न्यूझीलंडमधील परिस्थिती समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
पत्रकार परिषदेत बोलताना श्रेयस अय्यरने स्पष्ट केले की, वैभव हा थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये (अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात) स्थान मिळवू शकत नाही. त्याने भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, मात्र त्याला मिळालेल्या संधी अत्यंत मर्यादित राहिल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो झिम्बाब्वे दौऱ्यावरही गेला होता, परंतु मायदेशात अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत तो बेंचवरच होता. त्यानंतर त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली, मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता न्यूझीलंड दौऱ्यावर तो चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने, त्यापैकी कोणालाही बाहेर बसवणे योग्य ठरणार नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, "आमच्या ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यासारखा प्रतिभावान खेळाडू असणे ही आनंदाची गोष्ट आहे; वैभव खूप तरुण आहे. त्याला नियमित संधी मिळण्यासाठी अजून काही वर्षे लागतील. तो थेट संघात येऊन खेळू शकत नाही, विशेषतः आमचे सलामीवीर सातत्याने धावा करत आहेत. त्यांनी तर आम्हाला विश्वचषक जिंकून देण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे. संघासोबत परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे, त्याला तिथल्या परिस्थितीत कसे खेळायचे, हे समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे, भविष्यात जेव्हा तो पुन्हा अशा परिस्थितीत खेळेल, तेव्हा तो पूर्णपणे तयार असेल."
"संघाची गरज लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी खेळाडूंनी लवचिक असणे अत्यंत आवश्यक आहे. संघाच्या रणनीतीनुसार मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सध्या संघरचनेचा विचार केला, तर असे अनेक फलंदाज आहेत जे कदाचित खालच्या क्रमांकावर तितकेसे आक्रमक खेळू शकणार नाहीत. मात्र, माझ्या बाबतीत सांगायचे तर, मी परिस्थितीनुसार कोणत्याही क्रमांकावर मैदानात उतरू शकतो. मी फक्त वरच्या क्रमांकावरच फलंदाजी करेन असा कोणताही अट्टहास अथवा आग्रह माझा नाही."
"मागील विश्वचषकाकडे पाहिले तर इशान किशन सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता आणि आज तो अव्वल दर्जाच्या फलंदाजांपैकी एक म्हणून नावारूपाला आला आहे. त्यामुळे शेवटी वैयक्तिक आवडीपेक्षा संघाची गरज महत्त्वाची असून, प्रत्येक खेळाडूने परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची गरज असल्याचा सल्लाही श्रेयस अय्यरने दिला आहे."