Vaibhav Sooryavanshi Controversy pudhari
स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi Controversy: वैभव सूर्यवंशी पुरता अडकणार... डगआऊटमध्ये टीम मॅनेजरने केली मोठी चूक; BCCI कारवाई करणार?

Anirudha Sankpal

Vaibhav Sooryavanshi Controversy: भारतीय प्रीमयर लीग २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने धमाकेदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. वैभवसोबतच राजस्थान रॉयल्सचे अजून दोन फलंदाज हे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या ती क्रमांकावर आहेत. सांघिक कामगिरीबाबत बोलायचं झालं तर राजस्थान रॉयल्सने आपले चार पैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. मात्र आता हा दमदार कामगिरी करणारा राजस्थान एका मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तो व्हिडिओ होतोय व्हायरल

१० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील सामन्यावेळी राजस्थानचे टीम मॅनेजर रोमी भिंडर डगआऊटमध्ये मोबाईल वापरताना दिसत आहेत. सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात राजस्थानचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील दिसत आहे. या व्हिडिओमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.

व्हायरल क्लिपमध्ये स्पष्ट दिसत आहे की रोमी भिंडर हे डगआऊटमध्ये बसून मोबाईल पाहत आहेत. त्यांच्या शेजारी बसलेला वैभव सूर्यवंशी देखील या मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत आहे. ही घटना राजस्थानच्या डावातील ११ व्या षटकावेळीची असल्याचा दावा केला जात आहे. वैभव त्यावेळी आऊट होऊन डगआऊटमध्ये परतला होता.

नियम काय सांगतो?

आयपीएलच्या प्लेअर अँड मॅच ऑफिशियल्स एरिया प्रोटोकॉलनुसार डगआऊट, ड्रेसिंग रूम, खेळाडूंच्या बसण्याच्या जागी थर्ड अंपायर एरिना, मॅच रेफ्री रूम या ठिकाणी मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रिकल उपकरणे वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. टीम अॅनलिस्टकडे अॅनलिस्ट टेबलवर मर्यादित स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याची परवानगी आहे.

राजस्थाननं नियमाचं उल्लंघन केलं?

टीम मॅनेजरला फक्त ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरण्याची परवानगी आहे. मात्र डगआऊटमध्ये त्यांना फोन वापरण्याची परवानगी नाही. म्हणजे रोमी भिंडर यांनी नियमाचे उल्लंघन केलं आहे. त्याचबरोबर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना स्टेडियममध्ये पोहचल्यानंतर आपला मोबाईल स्मार्ट वॉच हे टीम सिक्युरिटी लाईजन ऑफिसर (SLO) याच्याकडे जमा करावे लागतात. त्यांना हे सामना संपल्यानंतर पुन्हा परत मिळते.

दरम्यान, डगआऊटमधून जो व्हिडिओ समोर आला आहे तो खूप गंभीर मानला जात आहे. हा नियम अँटी करप्शन नियमांशी निगडीत आहे. डगआऊटमध्ये मोबाईलचा वापर हा सामन्याच्यी निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

याबाबत बोलताना एका आयपीएल अधिकाऱ्याने सांगितलं की मॅनेजर आणि मीडिया मॅनेजरजवळ सामन्यावेळी फोन असतो मात्र त्याच्या वापराबाबत स्पष्ट नियम आहेत. डगआऊटमध्ये मोबाईलचा वापर ही गंभीर चूक आहे. विशेष म्हणजे खेळाडू जर स्क्रीन पाहत असेल तर ती मोठी चूक आहे. यात कोणताही ग्रे एरिया नाहीये.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT