स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi celebration : वैभव सूर्यवंशीने उलगडले 'A' सेलिब्रेशनमागचे रहस्य; अर्धशतकानंतरच्या अनोख्या आनंदाची चर्चा

IND vs ZIM T20 Series : पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकावर नजर

रणजित गायकवाड

हरारे : भारतीय संघाचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने मैदानातील आपल्या अनोख्या सेलिब्रेशनमागचे रहस्य अखेर उलगडले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अवघ्या १८ चेंडूंत धुवांधार अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने दोन वेगवेगळ्या शैलीत आनंद व्यक्त केला होता. पहिल्या सेलिब्रेशनमध्ये त्याने बोटांच्या साहाय्याने इंग्रजी 'A' अक्षराची मुद्रा केली. यापूर्वी आयपीएल सामन्यांदरम्यानही तो अशाच प्रकारे आनंद साजरा करताना दिसला होता. तर दुसऱ्या सेलिब्रेशनमध्ये त्याने दोन्ही हातांचे अंगठे उंचावून 'थंब्स अप' केले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये त्याने या सेलिब्रेशनमागची भावुक आणि रंजक पार्श्वभूमी सांगितली आहे.

या संदर्भात बोलताना वैभव म्हणाला, ‘मी पहिला A चे सेलिब्रेशन माझ्या आईसाठी केले होते आणि दुसरे सेलिब्रेशन रिंकू भैय्यासोबत झालेल्या चर्चेवर आधारित होते.’ विशेष म्हणजे, वैभवच्या आईचे नाव आरती सूर्यवंशी आहे. आपल्या आईच्या नावाचे पहिले अक्षर ('A') मैदानावर दाखवून हा युवा फलंदाज आपल्या यशाचा आनंद आणि श्रेय आईला समर्पित करतो.

कुटुंब, शिक्षक आणि मित्रांना समर्पित केली खेळी

वैभवने आपली ही तुफानी खेळी कुटुंब, प्रशिक्षक आणि मित्रांना समर्पित केली आहे, जे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढ-उतारांच्या काळात नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. याविषयी बोलताना तो म्हणाला, ‘माझ्या संपूर्ण प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या आणि चांगल्या-वाईट काळात सोबत राहणाऱ्या माझ्या कुटुंबाला, प्रशिक्षकांना आणि सर्व हितचिंतकांना मी ही खेळी समर्पित करू इच्छितो.’

हरारेच्या मैदानावर पुन्हा एकदा वैभवचा धुमाकूळ

इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीने हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर पुन्हा एकदा वादळी फलंदाजी केली. याच मैदानावर त्याने यापूर्वी अंडर-१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लैंडविरुद्ध अवघ्या ८० चेंडूंत १७५ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती.

या मैदानाबाबत आपले मत व्यक्त करताना वैभव म्हणाला, ‘तुम्ही असे म्हणू शकता की मला येथील वातावरण खूप आवडते. काही मैदाने अशी असतात जिथे तुम्हाला फलंदाजी करताना विशेष आनंद मिळतो, हे मैदान कदाचित माझ्यासाठी त्यांपैकीच एक आहे. तरीही मी कोणत्याच गोष्टीला सहजासहजी घेणार नाही. मी जिथे कुठे खेळेन, तिथे संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचाच माझा प्रयत्न असेल.’

पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकावर नजर

भारतीय संघाला पुढील दोन दिवसांत या मालिकेत उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. मालिकेतील दुसरा टी-२० सामना २५ जुलैला, तर तिसरा सामना २६ जुलैला याच मैदानावर पार पडणार आहे. आयपीएलमध्ये ३२ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीची नजर आता या मालिकेत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या शतकावर असेल. वैभवच्या बॅटमधून जेव्हाही पहिले आंतरराष्ट्रीय शतक येईल, ते अशाच धुवांधार शैलीत पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT