

लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 चक्रातील अंतिम सामन्याच्या ठिकाणाची आणि तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणारा हा बहुचर्चित अंतिम सामना इंग्लंडमधील लंडन येथील ऐतिहासिक द ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार असून तो 9 जून ते 13 जून 2027 या कालावधीत रंगणार आहे.
ICC ने गेल्या वर्षीच इंग्लंडला सलग तीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामने आयोजित करण्याचे हक्क दिले होते. त्यानुसार 2027, 2029 आणि 2031 या तीनही स्पर्धांचे यजमानपद इंग्लंडकडे राहणार आहे. प्रत्येक अंतिम सामन्यासाठी कोणते मैदान निवडायचे, याचा निर्णय इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) घेणार आहे.
द ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. यापूर्वी 2023 मध्ये याच मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. दरम्यान, 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सध्याचे सत्र आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत असून अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी नऊही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे.
गुणांच्या टक्केवारीच्या आधारे ऑस्ट्रेलिया सध्या 87.50 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या आठपैकी सात कसोटी सामने जिंकले आहेत. गतविजेता दक्षिण आफ्रिका 75 टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडने 72.22 टक्के गुणांसह विजेतेपदाच्या शर्यतीत मजबूत उपस्थिती कायम ठेवली आहे. तर मे महिन्यात पाकिस्तानला 2-0 अशा फरकाने पराभूत केल्यानंतर बांगलादेशाने 58.33 टक्के गुणांसह अंतिम फेरीच्या स्पर्धेत दमदार दावेदारी निर्माण केली आहे.
दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताचा संघ सध्या 48.15 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत नऊपैकी चार कसोटी सामने जिंकले आहेत. श्रीलंका 41.67 टक्के गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडची स्थिती मात्र सध्या फारशी समाधानकारक नाही. इंग्लंड 24.36 टक्के गुणांसह सातव्या, वेस्ट इंडिज 15 टक्के गुणांसह आठव्या, तर पाकिस्तान 8.33 टक्के गुणांसह नवव्या स्थानावर आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी या तिन्ही संघांना आगामी मालिकांमध्ये सातत्यपूर्ण आणि मोठे विजय मिळवणे अत्यावश्यक ठरणार आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या कसोटी मालिकांमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 25 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार असून दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असेल. त्यानंतर 13 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया आपल्या घरच्या मैदानावर बांगलादेशाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
यानंतर क्रिकेटप्रेमींचे लक्ष आशियाकडे वळणार आहे. 15 ऑगस्टपासून श्रीलंका आणि भारत यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची महत्त्वपूर्ण मालिका रंगणार आहे. या मालिकांचे निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील शर्यतीचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट करणारे ठरणार आहेत.