Vaibhav Sooryavanshi Fifty : वैभव सूर्यवंशीचे तुफानी अर्धशतक, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत

IND vs ZIM T20 Series : १५ वर्षीय फलंदाजाचा जागतिक विक्रम
Vaibhav Sooryavanshi Fifty : वैभव सूर्यवंशीचे तुफानी अर्धशतक, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत
Published on
Updated on

हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताच्या अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटच्या जोरावर असा धुमाकूळ घातला, जो क्रिकेट जगतात दीर्घकाळ स्मरणात ठेवला जाईल. सुरुवातीच्या तीन सामन्यांमधील अपयशानंतर चौथ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीला उतरलेल्या या डावखु-या युवा फलंदाजाने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची पुरती दाणादाण उडवली.

हरारे स्पोर्ट्स क्लबवर झिम्बाब्वेच्या आक्रमणाचा समाचार घेत वैभवने अवघ्या १९ चेंडूंत आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यासह जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले.

या ऐतिहासिक खेळीदरम्यान वैभव सूर्यवंशीने ४ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार ठोकले. रिचर्ड नगारवा, ब्रॅड इव्हान्स आणि ब्लेसिंग मुझराबानी यांच्यासारख्या मुख्य गोलंदाजांवर हल्ला चढवत त्याने मैदानाच्या चारी बाजूंना फटकेबाजी केली. जेव्हा नगारवाच्या चेंडूवर दोन धावा घेत वैभवने आपली फिफ्टी पूर्ण केली, तेव्हा संपूर्ण स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटाने गूंजले.

भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित कर्णधार श्रेयस अय्यर, मुख्य प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंनी उभे राहून या युवा ताऱ्याच्या खेळीला सलाम केला. ५० धावा पूर्ण केल्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर रिचर्ड नगारवाच्या शॉर्ट-पिच चेंडूवर तो बेन कुरेनकडे झेल देऊन बाद झाला. मात्र, बाद होण्यापूर्वी त्याने इतिहास रचला होता.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारा जगातील सर्वात युवा फलंदाज

या धडाकेबाज अर्धशतकासह वैभव सूर्यवंशी पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अर्धशतक ठोकणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि ११८ दिवस या टप्प्यावर हा पराक्रम करून दाखवला. या बाबतीत त्याने जगभरातील नामांकित फलंदाजांना मागे टाकले आहे.

  • वैभव सूर्यवंशी (भारत): १५ वर्षे ११८ दिवस (विरुद्ध जिम्बाब्वे, हरारे, २०२६)

  • लुईस ब्रूस (जिब्राल्टर): १६ वर्षे ५६ दिवस (विरुद्ध माल्टा, २०२१)

  • केविन चड्ढा (इंडोनेशिया): १६ वर्षे ७६ दिवस (विरुद्ध स्वीडन, २०२६)

  • अलुसीन तुरे (सिएरा लिओन): १६ वर्षे ८९ दिवस (विरुद्ध घाना, २०२३)

  • तेनजिन राबगे (भूतान): १६ वर्षे ११८ दिवस (विरुद्ध चीन, २०२३)

हरारे स्पोर्ट्स क्लबशी जुने नाते

हरारे येथील हे ऐतिहासिक मैदान वैभव सूर्यवंशीसाठी अत्यंत लकी ठरले आहे. याच मैदानावर खेळल्या गेलेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वैभवने इंग्लंडविरुद्ध अवघ्या ८० चेंडूंत १७५ धावांची अविश्वसनीय आणि ऐतिहासिक खेळी केली होती. आज जेव्हा तो वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी याच मैदानावर उतरला, तेव्हा त्याने जिथून सोडले होते तिथूनच सुरुवात करत पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीचे वर्चस्व सिद्ध केले.

आता वैभव सूर्यवंशीच्या नावावर ४ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये अवघ्या ४४ चेंडूंत ९२ धावा नोंदवल्या गेल्या असून, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये या वर्षातील ८१ षटकारही पूर्ण केले आहेत.

भारतासमोर १२६ धावांचे सोपे लक्ष्य

तत्पूर्वी, मालिकेतील या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय आक्रमणासमोर जिम्बाब्वेचा संघ निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून अवघ्या १२५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून प्रिन्स यादव आणि मयांक यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर रवी बिश्नोई आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ गडी बाद करत जिम्बाब्वेला मोठ्या धावसंख्येपासून रोखले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news