Tilak Varma Fight Video Pudhari
स्पोर्ट्स

Tilak Varma Fight Video: LIVE सामन्यात तिलक वर्माला पाकिस्तानी खेळाडूंनी घेरलं; मैदानावर जोरदार राडा, नेमकं काय घडलं?

Tilak Varma Fight Video: आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यातील सामन्यात तिलक वर्माला पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानात घेरले.

Rahul Shelke

Tilak Varma Fight Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हटला की मैदानावर तणावाचे वातावरण नेहमीच पाहायला मिळते. दोन्ही संघांमधील स्पर्धा आणि खेळाडूंमधील आक्रमक वृत्ती यामुळे अनेकदा मैदानात वाद होतात. असाच काहीसा प्रकार आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत पाहायला मिळाला.

या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय संघाचा कर्णधार तिलक वर्माला मैदानात घेरलं. त्याच्याशी जोरदार वाद घातला. एवढेच नाही, तर सामना संपल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडूंचा राग कायम असल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

भारताच्या डावातील ४४ व्या षटकात हा वाद सुरू झाला. पाकिस्तानचा गोलंदाज अली रझा गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिलाच चेंडू पंचांनी डेड बॉल घोषित केला. त्यावेळी तिलक वर्मा नॉन-स्ट्रायकरच्या बाजूला चुकीच्या जागी उभा होता. त्यामुळे पंचांनी चेंडू डेड बॉल ठरवला. त्यानंतर पंचांनी तिलक वर्मालाही योग्य जागी उभे राहण्याची सूचना केली.

मात्र, पंचांच्या या निर्णयावर पाकिस्तानी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. त्यांना हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे मैदानावर वादाला सुरुवात झाली.

पाकिस्तानी खेळाडूंनी तिलक वर्माला घेरलं

पाकिस्तान ए संघाचा कर्णधार अब्दुल समद आणि अहमद डॅनियल हे पंचांच्या निर्णयावर नाराज होते. त्यांनी पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच इतर पाकिस्तानी खेळाडूही या वादात सहभागी झाले.

पाकिस्तानी खेळाडूंनी एकत्र येत तिलक वर्माला मैदानात घेरलं. त्याच्याशी जोरदार वाद घातला. त्यामुळे काही काळ मैदानावरील वातावरण चांगलेच तापले. खेळ सुरू असताना दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. अखेर हा वाद शांत झाल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

तिलक बाद झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने विकेट काढून फेकली

तिलक वर्मा आणि पाकिस्तानी खेळाडूंमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. मात्र, सामना संपेपर्यंत मैदानावरील तणाव कायम होता.

शेवटची सामन्याची विकेट पडली आणि ती तिलक वर्माची होती. त्यानंतर तो पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना एका पाकिस्तानी खेळाडूने मैदानावरील विकेट काढून फेकली. त्यामुळे या सामन्यातील वादाची चर्चा आणखी वाढली.

तिलक वर्माचे शतकही भारताला विजय मिळवून देऊ शकले नाही

या सामन्यात तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली. त्याने १४९ चेंडूंचा सामना करत १०० धावांची खेळी केली. मात्र, त्याचे शतक भारताला विजय मिळवून देऊ शकले नाही. पाकिस्तान ए संघाने भारत ए संघाचा ४८ धावांनी पराभव केला.

सामन्यानंतर तिलक वर्माने आपली प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या फलंदाजाकडून चांगली साथ मिळाली असती, तर भारत हा सामना जिंकू शकला असता, असे त्याने म्हटले. तिलकचे शतक, मैदानावरील वाद आणि पाकिस्तानी खेळाडूंचे आक्रमक वर्तन यामुळे हा सामना चांगलाच चर्चेत आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT