स्पोर्ट्स

कुस्तीगीर परिषदेची ‘एमओए’तील ‘पत’ राहणार

Arun Patil

सुनील जगताप ; पुणे : भारतीय कुस्ती संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करीत त्या ठिकाणी नवीन त्रिसदस्यीय प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये (एमओए) असलेले कुस्तीगीर परिषदेचे स्थान या निर्णयाने बदलणार नसून, वरिष्ठ उपाध्यक्षपद कायम राहील, असे सूतोवाच 'एमओए'च्या अधिकार्‍यांनी केले.

राज्यात विविध खेळांच्या जिल्हा आणि राज्य संघटना कार्यरत आहेत. या सर्व संघटनांची शिखर संघटना म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन काम करीत असते. या असोसिएशनमध्ये प्रत्येक खेळातील राज्य संघटनांचा प्रतिनिधी विविध पदांवर कार्यरत असून, संघटना आणि खेळाडूंच्या दृष्टीने काम करीत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून परिषदेचे तत्कालीन महासचिव बाळासाहेब लांडगे 'एमओए'वर प्रतिनिधी म्हणून जात असताना त्याठिकाणी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, आता कुस्तीगीर परिषदच बरखास्त केल्याने 'एमओए'तील वरिष्ठ उपाध्यक्षही बदलणार का, अशी चर्चा खेळाडू आणि संघटकांमध्ये सुरू आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची निवड होत असताना खेळाडू आणि संबंधित संघटना महत्त्वाची की संबंधित व्यक्ती केंद्रस्थानी ठेवण्यात येणार, याबाबतही क्रीडा क्षेत्रात चर्चा सुरू आहे. तूर्तास 'एमओए'मधील कुस्तीगीर परिषदेचे अस्तित्व कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्तीचा निर्णय झाला असला तरी 'एमओए'ची निवडणूक यापूर्वी पार पडलेली आहे. परिषदेच्या वतीने 'एमओए'वर बाळासाहेब लांडगे यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून यापूर्वीच निवड झाली असून, आता कारवाई झाली आहे. त्यामुळे चार वर्षांचा कार्यकाळ लांडगे पूर्ण करू शकणार असून, बरखास्तीचा परिणाम जाणवणार नाही.
– नामदेव शिरगावकर,
सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT