BCCI announced 125 crore rewards distributed in players and support staff
बीसीसीआयने जाहीर केलेल्या १२५ कोटी रूपयांच्या बक्षिसाची रक्कम खेळा़डू आणि सपोर्ट स्टाफमध्ये विभागून देण्यात आली. BCCI File Photo
स्पोर्ट्स

'बीसीसीआय'ने जाहीर केलेल्या 125 कोटी रूपयांच्या बक्षिसाची अशी होणार वाटणी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 29 जून रोजी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. या शानदार विजयानंतर बीसीसीआयने जाहीर केलेली बक्षीसाची रक्कम संघातील सदस्यांमध्ये कशी वाटली जाईल, याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. याबद्दल आता अधिकृत माहिती समोर येत आहे.

मायभूमीत जल्लोषात स्वागत

भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर विश्वविजेत्या संघाचे मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुरुवारी (दि.4) टीम बार्बाडोसहून नवी दिल्लीत पोहोचली आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर संघ संध्याकाळी मुंबईला पोहोचला जिथे भारतीय खेळाडूंचे विमानतळावर प्रथम स्वागत करण्यात आले. यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून विजयी मिरवणुकीने संघाचे स्वागत करण्यात आले. या विजय मिरवणुकीत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. विजय मिरवणुकीनंतर, बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा सत्कार केला जेथे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी संघाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला

प्रशिक्षक द्रविड यांच्यासह 15 खेळाडूंना सर्वाधिक रक्कम

'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेपैकी 15 सदस्यीय भारतीय संघातील खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सर्वाधिक रक्कम मिळाली. विशेष म्हणजे या 15 सदस्यांमध्ये असे तीन खेळाडू आहेत. ज्यांनी स्पर्धेतील एकाही सामन्यात प्लेइंग-11चा भाग नव्हते. यामध्ये यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसह संघातील 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळाले आहेत.

कोचिंग स्टाफला अडीच कोटी रुपयाचे बक्षिस

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला त्याच्या इतर सहकाऱ्यांना अडीच कोटी रुपये देण्यात आले. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांना अडीच कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात आले आहेत. फिजिओथेरपिस्ट, थ्रोडाउन स्पेशलिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यासारख्या स्टाफला प्रत्येकी 2 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

सिलेक्टर्स-राखीव खेळाडूंनाही मिळाली मोठी रक्कम

खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ व्यतिरिक्त अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ निवड समिती आणि चार राखीव खेळाडूंचाही बक्षीस रकमेत मोठा वाटा आहे. रिपोर्टनुसार, रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांच्याशिवाय निवड समितीच्या पाच सदस्यांना या बक्षीस रकमेतून प्रत्येकी एक कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय, बक्षिसाची रक्कम व्हिडिओ विश्लेषक आणि बीसीसीआय कर्मचारी सदस्यांमध्ये देखील विभागली गेली आहे.

SCROLL FOR NEXT