Sanath Jayasuriya : श्रीलंकेला मिळाला नवा कोच! जयसुर्या देणार संघाला जिंकण्याचे धडे

जयसूर्याकडे अंतरिम प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Sanath Jayasuriya Sri Lanka Coach
श्रीलंकेने संघाच्या अंतरिम मुख्य प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्याची नियुक्ती केली आहे. Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sanath Jayasuriya Sri Lanka Coach : भारताविरुद्धच्या आगामी टी-20 आणि एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने संघाच्या अंतरिम मुख्य प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्याची नियुक्ती केली आहे. ख्रिस सिल्व्हरवुडने टी-20 विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता जयसूर्याला संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

Summary
  • श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जयसूर्या यांना संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक नियुक्त केले.

  • ते भारताविरुद्धच्या मालिकेने सुरुवात करतील.

  • भारतीय संघ श्रीलंका दौ-यावर जाणार आहे.

  • उभय संघांमध्ये टी-20 आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे.

टी-20 विश्वचषकात खराब कामगिरी

2024 च्या टी-20 विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. संघाने गट टप्प्यात एकूण 4 सामने खेळले. त्यापैकी त्यांना केवळ 1 सामना जिंकला, तर 2 सामने गमावले. पावसामुळे एका सामन्याचा निकाल जाहीर झाला नाही. त्यामुळे लंकन संघाला सुपर आठ फेरी गाठता आली नाही. यानंतर मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कुटुंबाचा हवाला देत त्यांनी श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याची घोषणा केली होती. तर महेला जयवर्धने यांनीही क्रिकेट सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता.

जयसूर्याला अंतरिम प्रशिक्षक

या दोन दिग्गजांच्या राजीनाम्यानंतर आता जयसूर्याकडे अंतरिम प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकात सल्लागार म्हणूनही तो संघासोबत होते आणि त्यामुळेच त्यांना संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. श्रीलंकेचा संघ नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू ठेवणार आहे.

सिल्व्हरवुड यशस्वी, पण...

आयसीसी टूर्नामेंटमध्ये श्रीलंकचा संघ सातत्याने अपयशी ठरत आहे. ख्रिस सिल्व्हरवुड यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने 2022 मध्ये टी-20 आशिया कपचे विजेतेपद पटकावले. या संघाने 2023 च्या आशिया कप फायनलमध्येही प्रवेश केला होता, जिथे त्यांना भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. याशिवाय सिल्व्हरवुड यांच्या कोचिंगखाली श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत घरच्या मैदानावर विजय मिळवला होता. तर बांगलादेशमध्ये कसोटी मालिका जिंकली. तथापि, एकूणच आयसीसी टूर्नामेंटमध्ये श्रीलंकेचा संघ आता पूर्वीसारखी कामगिरी करताना दिसत नाही. आता भारतीय संघ 27 जुलैपासून तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. मायदेशातील मालिकेत श्रीलंकन संघ कसा खेळतो याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जयसूर्या यांची कामगिरी

सन 1989 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणारे सनथ जयसूर्या श्रीलंकेसाठी 586 सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 21032 धावा केल्या आणि 42 शतके झळकावली. त्यांनी 1991 ते 2007 दरम्यान श्रीलंकेसाठी 110 कसोटीत 6973 धावा केल्या. या काळात त्यांची सरासरी 40.07 राहिली. यात 14 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 445 एकदिवसीय सामन्यांमध्ये 28 शतके आणि 68 अर्धशतकांच्या जोरावर 13,430 धावा केल्या आहेत. जयसूर्या यांनी कसोटीत 98 आणि वनडेत 323 विकेट्स घेतल्या आहेत. 1996 मध्ये श्रीलंकन संघाला विश्व विजेता बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news