स्पोर्ट्स

WTC 2025-2027 : श्रीलंका-बांगला देश यांच्यातील सामन्याने नवे WTC चक्र होणार सुरू

मंगळवारपासून रंगणार पहिला सामना; भारताच्या मोहिमेला 20 जूनपासून प्रारंभ

रणजित गायकवाड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पुढील चक्र 17 जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंकेतील गॅले येथे श्रीलंका आणि बांगला देश यांच्यात खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियन संघ स्वतः या महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सुरुवात करेल. ऑस्ट्रेलियन संघाने ती मालिका गमावली तर रँकिंगमध्ये नुकसान होऊ शकते; परंतु जर कांगारू संघाने मालिका जिंकली तर ते इतर संघांपेक्षा आणखी पुढे जाईल.

ऑस्ट्रेलियाला खेळावे लागणार सर्वाधिक 22 सामने

वेळापत्रकानुसार, ऑस्ट्रेलिया यावेळी सर्वाधिक 22 सामने खेळेल, तर इंग्लंडला 21 सामने खेळावे लागतील. या वर्षाच्या अखेरीस अ‍ॅशेस मालिकेदरम्यान दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील, तर भारतीय संघ 20 जूनपासून नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मोहिमेला सुरुवात करणार आहे. एकूण 71 सामने असलेले आणि पुढील दोन वर्षांच्या कालावधीत होणार्‍या डब्ल्यूटीसी 2025-27 या चक्रामध्ये नऊ संघ सहभागी होतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दोन वेळा उपविजेता ठरलेली टीम इंडियाचा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने सुरुवात करेल.

नव्या चक्रात भारत खेळणार 18 सामने

2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात भारत 18 कसोटी सामने खेळणार आहे. यामध्ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका, तसेच इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड दौर्‍यावर संघ जाणार आहे.

फायनलमध्ये पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया कसोटीत नंबर वन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत शनिवार, 14 जून रोजी दक्षिण आफ्रिकेने कसोटी विश्वचषकावर आपले नाव कोरले. मात्र, या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणारा दक्षिण आफ्रिका संघ रँकिंगमध्ये तिसर्‍या वरून दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 123 गुण तर दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 114 गुण आहेत. या मानांकनात भारतीय संघ 105 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT