Amol Mazumdar Profile: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दमदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि इतिहास रचला. ही भारताच्या महिला संघाची पहिली ICC ट्रॉफी आहे. मैदानावर खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली, पण या विजयामागे आणखी एक व्यक्ती तितकाच कौतुकास पात्र आहे तो म्हणजे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार.
अनेकांना त्यांचं नाव ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण अमोल मुजुमदार हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं एक असं नाव आहे, ज्यांनी 11,000 हून अधिक धावा केल्या, पण तरीही त्यांना टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
11 नोव्हेंबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या अमोल मुजुमदार यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्यांची फलंदाजी इतकी जबरदस्त होती की त्यांनी केवळ 19 व्या वर्षी रणजी ट्रॉफी पदार्पणात नाबाद 260 धावांची खेळी करत विश्वविक्रम केला होता. तब्बल दोन दशके हा विक्रम त्यांच्या नावावर राहिला.
मुजुमदार हे मुंबई क्रिकेटचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी रणजी ट्रॉफीत तब्बल 171 सामने खेळले आणि 48.13 च्या सरासरीने 11,167 धावा केल्या. त्यांच्या नावावर 30 शतके आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने 37वा रणजी किताब जिंकला होता. इतकं जबरदस्त करिअर असूनही त्यांना भारतीय संघात स्थान मिळालं नाही. त्यांच्या नशिबाने त्यांच्यावर अन्याय केला, पण त्यांनी हार मानली नाही.
2014मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अमोल मुजुमदार यांनी प्रशिक्षक म्हणून नवा प्रवास सुरू केला. त्यांनी अंडर-19 आणि अंडर-23 संघांना मार्गदर्शन केलं, तसेच तीन वर्षं ते राजस्थान रॉयल्सचे बॅटिंग कोच होते. त्यानंतर त्यांनी मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली.
ऑक्टोबर 2023 मध्ये BCCI ने त्यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. त्यांनी संघाचा खेळ सुधारण्यासाठी नव्या स्ट्रॅटेजी तयार केल्या, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आणि एक नवा संघ निर्माण केला.
2025 मध्ये त्यांची मेहनत फळाला आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, आणि इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलं. तसं पाहिलं तर, खेळाडू म्हणून नशिबाने त्यांना संधी दिली नाही, पण प्रशिक्षक म्हणून त्यांनी भारताला शिखरावर पोहोचवलं आहे.
अमोल हा शालेय काळातच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा सहकारी होता. शारदाश्रमच्या ऐतिहासिक सामन्यात सचिन-विनोदने विक्रमी भागीदारी केली तेव्हा पुढचा फलंदाज म्हणून पॅड बांधून बसलेला अमोलच होता. पण त्याचा नंबर आलाच नाही.
पहिल्याच रणजी सामन्यात नाबाद 260 धावा करून वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या अमोलकडे सगळ्यांचे लक्ष गेले. तो भारताच्या अंडर-19 संघाचा उपकर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली द्रविड आणि गांगुली खेळले. पण राष्ट्रीय संघातल्या निवडीचं राजकारण, विभागीय लॉबिंग आणि एका सिलेक्टरशी झालेला वाद, या सगळ्यामुळे अमोलची कारकीर्द ‘मुंबईपुरती’च मर्यादित राहिली.
तरीही तो हारला नाही. त्याने रणजीमध्ये सलग शतकं ठोकली, मुंबईला अनेकदा विजेते केलं आणि अखेर 11,000 हून अधिक धावा करून स्वतःचा ठसा उमटवला. क्रिकेटमधील संयम आणि धैर्य त्याच्या रक्तातच होतं. जे त्याला पुढे कोचिंगच्या कारकिर्दीतही उपयोगी पडलं.
आज अमोल मुझुमदार भारतीय महिला संघाचा यशस्वी मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला आहे. ज्या फलंदाजाला स्वतः भारतासाठी खेळायची संधी मिळाली नाही, त्याने आपल्या प्रशिक्षणातून भारताला जागतिक विजेता बनवलं. अमोल मुजुमदार यांची ही कहाणी खरंच प्रेरणादायी आहे.