

Harmanpreet Kaur Jay Shah:
भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. हरनप्रीतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं आयसीसीचे चेअरमन जय शहा यांच्या हस्ते विश्वविजेतेपदाची ट्रॉफी स्विकारली. मात्र हरमनप्रीत ही ट्रॉफी स्वाकारताना जय शहा यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत होती. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतानं दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर ट्रॉफी घेण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर पोडियमवर पोहचली. यावेळी ती एकटीच होती. तिनं ट्रॉफी वितरित करणाऱ्या जय शहा यांच्याशी अत्यंत उत्साहात हस्तांदोलन केलं. त्यानंतर हरमनप्रीत कौरनं जय शहा यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. मात्र जय शहा यांनी हरमनप्रीतला असं करण्यापासून रोखलं त्यानंतर जय शहा यांनी हरमनप्रीत कौरकडे विश्वविजेतेपदाची ट्रॉफी सुपूर्द केली.
ट्रॉफी मिळाल्यानंतर हरमनप्रीतनं आणि संघातील खेळाडूंनी एकच जल्लोष केला. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जय शहा यांनी बीसीसीआयचे सचिव असताना भारतीय महिला क्रिकेटच्या भरभराटीसाठी अनेक महत्वाची पावले उचलली होती. त्यांनी आयपीएलप्रमाणे WPL ची सुरूवात केली. ही स्पर्धा सुरू करण्यात जय शहा यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर पुरूषांच्या बरोबरीनं महिला क्रिकेटपटूंना देखील मानधन देण्यात देण्यात, मानधनात समानता आणण्यात देखील जय शहा यांचा सिंहाचा वाटा आहे.
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपवर भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं दक्षिण अफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. गोलंदाजीत दिप्ती शर्मानं ५ विकेट्स घेत विजयात मोठा वाटा उचलला. तर फायनलच्या प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या शफाली वर्मानं ८७ धावांची धडाकेबाज खेळी केली. दिप्ती शर्मा ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील ठरली.
भारतानं प्रथम फलंदाजी करताना २९८ धावा केल्या होत्या. त्यात शफालीच्या ८७ तर दिप्ती शर्माच्या ५८ धावांचे योगदान मोठे होते. भारताचं हे आव्हान दक्षिण अफ्रिकेला पेलवलं नाही. भारतानं ५२ धावांनी सामना जिंकत पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं.
भारतीय संघ यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये महिला वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचली होती. मात्र टीम इंडियाला फायनल जिंकण्यात यश आलं नाही. अखेर २०२५ मध्ये हे स्वप्न पूर्ण झालं.