स्पोर्ट्स

Cricket rules big Change : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीत मोठे फेरबदल; ICCकडून 'प्लेइंग कंडिशन्स' जाहीर

कसोटी क्रिकेटमध्ये 'स्टम्प्स'चे गणित बदलले; आता शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार थरार!

रणजित गायकवाड

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटमधील विविध प्रकारांच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) 'प्लेइंग कंडिशन्स'मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत. खेळात होणारा अनावश्यक वेळकाढूपणा रोखणे, चेंडूंचे आकारमान आणि वजन प्रमाणित करणे तसेच क्षेत्ररक्षणाशी संबंधित नियमांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे, हा या सुधारणांमागील मुख्य उद्देश आहे. हे नवे नियम १ ऑक्टोबर किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय मालिकांना लागू होणार असून, सध्या सुरू असलेल्या मालिका जुन्या नियमांनुसारच खेळवल्या जातील.

मेरिलेबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) सुधारित क्रिकेट नियमावलीचा आधार घेऊन तयार करण्यात आलेली ही नवी नियमावली आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आयसीसीच्या पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या बदलांचे स्वागत करताना सांगितले, "खेळाचा वेग वाढवणे, क्षेत्ररक्षणाचे नियम स्पष्ट करणे आणि चेंडूंच्या मानकांसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आधुनिक क्रिकेटची गरज ओळखून आणि खेळाची विश्वासार्हता व सातत्य अबाधित ठेवूनच हे बदल अमलात आणण्यात आले आहेत."

सर्व प्रकारांसाठी लागू होणारे महत्त्वाचे बदल:

1. वेळकाढूपणा करणाऱ्या फलंदाजांवर दंडात्मक कारवाई:

फलंदाजांनी ठरवून दिलेल्या वेळेत चेंडूचा सामना करण्यासाठी तयार होणे आता बंधनकारक असेल. फलंदाजाने वेळकाढूपणा केल्यास पहिल्या चुकीवर औपचारिक इशारा, दुसऱ्यांदा अंतिम इशारा दिला जाईल. मात्र, तिसऱ्यांदा किंवा त्यानंतर प्रत्येक वेळी अशाच प्रकारचा वेळकाढूपणा आढळल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थेट ५ पेनल्टी धावा (Penalty Runs) दिल्या जातील. गंभीर किंवा वारंवार होणाऱ्या उल्लंघनावर आयसीसीच्या आचारसंहितेनुसार (Code of Conduct) कारवाई होऊ शकते.

2. क्रिकेट चेंडूंची स्वतंत्र मानके निश्चित:

आतापर्यंत उत्पादकांकडून महिला व कनिष्ठ (ज्युनिअर) क्रिकेटसाठी अनेकदा एकाच प्रकारचा चेंडू वापरला जात असे. मात्र, नव्या नियमांनुसार पुरुष, महिला आणि कनिष्ठ क्रिकेट अशा तिन्ही स्तरांसाठी चेंडूंचे वजन व आकारमान यांची स्वतंत्र आणि अचूक मानके निश्चित करण्यात आली आहेत.

  • पुरुषांच्या चेंडूचे वजन: १५६ ते १६३ ग्रॅम (५.५ ते ५.७५ औंस), परिघ: २२.४ ते २२.९ सेमी.

  • महिलांच्या चेंडूचे वजन: १४२ ते १४९ ग्रॅम (५ ते ५.२५ औंस), परिघ: २१.५ ते २२ सेमी.

1. 'ओव्हरथ्रो'ची स्पष्ट व्याख्या:

ओव्हरथ्रोबाबतची संदिग्धता दूर करण्यात आली आहे. धावा रोखण्यासाठी किंवा धावबाद करण्याच्या उद्देशाने यष्ट्यांच्या दिशेने थेट फेकलेला चेंडू म्हणजेच 'ओव्हरथ्रो' मानला जाईल. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवताना झालेली चूक (मिसफिल्ड) किंवा दुसऱ्या सहकाऱ्याकडे दिलेला चेंडू ओव्हरथ्रो समजला जाणार नाही.

'बॉल सेटल' संदर्भात पंचांचे अधिकार:

सामन्यातील चेंडू अखेर 'सेटल' (खेळ तात्पुरता थांबल्याची स्थिती) कधी झाला, हे ठरवण्याचे अधिक अधिकार आता पंचांकडे असतील. चेंडू सेटल मानण्यासाठी तो गोलंदाज अथवा यष्टिरक्षकाच्या हातात असणेच अनिवार्य नाही. अटीतटीच्या सामन्यांच्या अंतिम क्षणी हा नियम अत्यंत कळीचा ठरणार आहे.

चेंडूवर पूर्ण नियंत्रण आवश्यक (धावबाद व यष्टिचित):

  • धावबाद किंवा यष्टिचित करताना चेंडू यष्ट्यांना लागत असताना क्षेत्ररक्षकाचे चेंडूवर 'संपूर्ण नियंत्रण' असणे बंधनकारक असेल. चेंडू केवळ हाताला लागून यष्ट्या उडाल्यास ती विकेट मानली जाणार नाही.

कसोटी क्रिकेटमधील बदल:

  • दिवसाच्या सामन्यांत 'गुलाबी चेंडू'चा प्रायोगिक वापर:

    खराब प्रकाशामुळे खेळाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी, दोन्ही संघांच्या परस्पर संमतीने दिवसा खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांतही गुलाबी चेंडूचा वापर करण्यास प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय सामना सुरू होण्यापूर्वीच घ्यावा लागेल आणि संपूर्ण सामन्यात तोच चेंडू वापरावा लागेल. सामना सुरू झाल्यावर लाल चेंडू बदलून गुलाबी चेंडू वापरता येणार नाही.

  • दिवसाच्या शेवटच्या षटकात बाद झाल्यावरही खेळ सुरू राहणार:

    दिवसाच्या अखेरच्या षटकात एखादा फलंदाज बाद झाल्यास आधीप्रमाणे दिवसाचा खेळ लगेच संपणार नाही. वातावरण आणि प्रकाश योग्य असल्यास त्या षटकातील उर्वरित चेंडू त्याच दिवशी पूर्ण केले जातील. यामुळे दुसऱ्या दिवशी खेळाचा वेळ वाया जाणार नाही आणि सामन्यातील चुरस कायम राहील.

मर्यादित षटकांचे सामने (ODI आणि T20I):

  • टी-२० डावांमधील अंतर निश्चित:

    आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये दोन डावांच्या दरम्यान आता १५ मिनिटांचा निश्चित ब्रेक असेल. खेळात वेळ वाया गेलेला असल्यास हा ब्रेक किमान १० मिनिटांपर्यंत कमी केला जाऊ शकतो.

  • ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मुख्य प्रशिक्षकांना मैदानात जाण्याची मुभा:

    एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांत ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मुख्य प्रशिक्षक किंवा त्यांच्या प्रतिनिधीला मैदानात जाऊन खेळाडूंशी संवाद साधण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.

  • 'वाइड बॉल'चा नियम कायमस्वरूपी लागू:

    गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी किंवा टाकत असताना फलंदाज क्रीझमध्ये जागा बदलत असल्यास, चेंडू टाकण्याच्या नेमक्या क्षणी फलंदाजाच्या पायाची स्थिती काय होती, यावरून चेंडू 'वाइड' आहे की नाही हे ठरवले जाईल. प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेला हा नियम आता एकदिवसीय व टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी लागू करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT