Team India biggest ODI win : 406 धावांचा यशस्वी पाठलाग! भारताचा अविश्वसनीय विजय, गिलचा विक्रमी द्विशतकी तडाखा

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे धडाकेबाज शतक
Team India biggest ODI win : 406 धावांचा यशस्वी पाठलाग! भारताचा अविश्वसनीय विजय, गिलचा विक्रमी द्विशतकी तडाखा
Published on: 
Updated on: 

गुवाहाटी : कौशल्य, थरार आणि आक्रमकतेचा अद्भूत मिलाफ दाखवत भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४०६ धावांचा अशक्यप्राय वाटणारा डोंगर लिलया सर केला. महाप्रचंड लक्ष्य समोर असतानाही भारतीय संघाचा विश्वास तसूभरही डळमळीत झाला नाही. आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेला भारताचा कर्णधार शुभमन गिल याने एका अविश्वसनीय, वादळी आणि ऐतिहासिक खेळीने ४०६ धावांचे आव्हान वाऱ्यासारखे उडवून लावले. यासह टीम इंडियाने ८ गडी राखून अविश्वसनीय विजय मिळवला.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ४०० हून अधिक धावांचा पाठलाग होण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. यापूर्वी २००६ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३८ धावांचा पाठलाग करून असा पराक्रम रचला होता; आज तब्बल दोन दशकांनंतर भारताने त्या सुवर्णक्षणाची पुनरावृत्ती केली.

विंडीजचा चौफेर तडाखा: तीन फलंदाजांची झंझावाती शतके

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. सलामीवीर केसी कार्टी अवघ्या ९ धावांवर बाद झाल्यानंतर जॉन कॅम्पबेल आणि कर्णधार शाय होप यांनी सामन्याची धुरा हाती घेतली. कॅम्पबेलने सुरुवातीपासूनच भारतीय माऱ्याचा समाचार घेत ६८ चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांसह १०१ धावांची धुंवाधार खेळी केली.

कॅम्पबेल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अमीर जांगूने भारतीय गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत चौफेर फटकेबाजी केली. शाय होप (९४ चेंडूंत १०४ धावा, ८ चौकार, ३ षटकार) आणि जांगू यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १८२ धावांची भागीदारी झाली. जांगूने अवघ्या ७७ चेंडूंत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ११४ धावांची स्फोटक खेळी साकारली. पहिल्या १० षटकांच्या पॉवरप्लेमध्येच विंडीजने ९६ धावा कुटल्या होत्या. अखेरच्या षटकांमध्ये रोस्टन चेस (नाबाद २९) आणि शामर जोसेफ (नाबाद १४) यांनी केलेल्या उपयुक्त फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ बाद ४०५ धावांचा विशाल डोंगर उभा केला.

भारताकडून गुरनूर ब्रार (२/९६), कुलदीप यादव (२/६५) आणि रवींद्र जडेजा (२/७५) यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले, तर प्रसिध कृष्णाला एक गडी मिळाला.

रोहित-गिलची २५५ धावांची ऐतिहासिक सलामी; विंडीजचे गोलंदाज निष्प्रभ

विजयासाठी ४०६ धावांचे महाकाय लक्ष्य समोर असताना भारतीय डावाची सुरुवात वादळी झाली. कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा या जोडीने पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्र घेतला. पहिल्या १० षटकांच्या पॉवरप्लेमध्येच या दोघांनी ९२ धावा फटकावून विजयाचा मजबूत पाया रचला.

रोहित शर्माने जुन्या लयीत फलंदाजी करताना अवघ्या ७५ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने १०१ धावांचे झंझावाती शतक झळकावले. गिल आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या १५८ चेंडूंत २५५ धावांची भागीदारी रचत विंडीजच्या गोलंदाजांचे मनोधैर्य खचवून टाकले. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेला विराट कोहलीही आक्रमक मूडमध्ये होता; त्याने १९ चेंडूंत २९ धावा (३ चौकार, १ षटकार) ठोकून धावगती कायम ठेवली.

गिलचा जागतिक विक्रम: लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या

विराट कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिलने संपूर्ण सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत अवघ्या १३३ चेंडूंत नाबाद २२३ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. या खेळीत गिलने तब्बल २६ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार खेचले (स्ट्राइक रेट १६७.६७).

या खेळीसह शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना (Run Chase) सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्याने ग्लेन मॅक्सवेलच्या ऐतिहासिक २०१ धावांच्या खेळीला मागे टाकले.

लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोच्च वैयक्तिक खेळी (ODI):

  • शुभमन गिल: २२३* वि. वेस्ट इंडिज (गुवाहाटी, २०२६)

  • ग्लेन मॅक्सवेल: २०१* वि. अफगाणिस्तान (वानखेडे, २०२३)

  • फखर झमान: १९३ वि. दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग, २०२१)

  • शेन वॉटसन: १८५* वि. बांगलादेश (मीरपूर, २०११)

  • महेंद्रसिंग धोनी: १८३* वि. श्रीलंका (जयपूर, २००५)

  • विराट कोहली: १८३ वि. पाकिस्तान (मीरपूर, २०१२)

अवघ्या ४३.३ षटकांत भारताचा अविश्वसनीय विजय

गिलला दुसऱ्या टोकाकडून ऋतुराज गायकवाडने संयमी साथ दिली. गायकवाडने ३७ चेंडूंत नाबाद ३१ धावा केल्या आणि गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची अभेद्य भागीदारी रचली. भारताने हे ४०६ धावांचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य अवघ्या ४३.३ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ४०६ धावा करत तब्बल ३९ चेंडू राखून सहज पार केले. भारताचा रनरेट ९.३३ इतका अफाट राहिला.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. जेडन सील्सने ८ षटकांत ७८ धावा मोजून १ बळी घेतला, तर शामर जोसेफने ६ षटकांत ५२ धावा देऊन १ गडी बाद केला. अल्झारी जोसेफ (८ षटकांत ८९ धावा) आणि किमो पॉल (३ षटकांत ४९ धावा) यांना भारतीय फलंदाजांनी अक्षरशः धू-धू धुतले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ४००+ धावांचा विक्रम

या सामन्यात दोन्ही डावांत ४०० हून अधिक धावा झाल्यामुळे विक्रमांची नवी नोंद झाली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ४०० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा भारताचा स्वतःचाच जागतिक विक्रम अधिक भक्कम झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news