Team India’s Super-8 Schedule: T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी करत सलग विजय मिळवले आहेत. बुधवारी होणाऱ्या अखेरच्या लीग सामन्यानंतर भारत अधिकृतपणे सुपर-8 मध्ये प्रवेश करणार आहे. आधीच पात्र ठरलेल्या भारतीय संघासमोर आता सुपर-8 मध्ये तीन महत्त्वाचे सामने असणार आहेत.
या फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजशी होणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही सामने भारतातच खेळवले जाणार असून सर्व सामने सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.
22 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना रंगणार आहे.
26 फेब्रुवारीला चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल.
1 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने येतील.
दरम्यान, सुपर-8 साठी आतापर्यंत सात संघ पात्र ठरले आहेत. भारतासह इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचा यात समावेश आहे. उरलेल्या एका जागेसाठी पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात आज निर्णायक सामना होणार असून पाकिस्तान हरल्यास थेट स्पर्धेबाहेर जाईल.
भारतातील प्रेक्षकांना सुपर-8 मधील भारताचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील. मोबाईलवर सामना पाहायचा असल्यास जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. प्रेक्षकांना मराठीसह विविध भाषांमध्ये सामना पाहण्याचा पर्याय आहे.
या विश्वचषकात सेमीफायनल आणि फायनलचे ठिकाण पाकिस्तानच्या पात्रतेवर अवलंबून आहे. पहिला सेमीफायनल सामना 4 मार्च रोजी खेळला जाणार असून पाकिस्तान पात्र ठरल्यास तो सामना श्रीलंकेत होईल. दुसरा सेमीफायनल 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
8 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याबाबतही अशीच अट आहे. पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचल्यास सामना श्रीलंकेत होईल, अन्यथा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजेता ठरेल.
भारतीय संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून सुपर-8 मधील कामगिरीवरच सेमीफायनलचे गणित ठरणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेऊन भारत विजयी घोडदौड कायम ठेवतो का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष आहे.