स्पोर्ट्स

Team India Upcoming Matches : 4 कसोटी, 6 वनडे, 10 टी-20... जाणून घ्या टीम इंडियाचे पुढील वेळापत्रक

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वनडे संघात पुनरागमन होणार

रणजित गायकवाड

team india upcoming matches check dates full schedule time table

मुंबई : आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे उर्वरित वर्षाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये भारत 4 कसोटी, 6 वनडे आणि 10 टी-20 सामने खेळणार आहे. या काळात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून कडवी झुंज अपेक्षित आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मालिकेद्वारे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वनडे संघात पुनरागमन होणार आहे.

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अजिंक्य राहून टी-20 आशिया चषकावर नाव कोरले. रविवारी (दि. 28) दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात ‘टीम इंडिया’ने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत नवव्यांदा आशिया चषक जिंकला. या विजयात तिलक वर्मा हिरो ठरला. त्याने नाबाद खेळी करत संघाला कठीण परिस्थितीतून विजय मिळवून दिला.

कोणकोणत्या संघांशी होणार संघर्ष?

भारतीय संघ आशिया चषकानंतर सर्वप्रथम वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेसोबत भारतीय संघ ‘व्हाईट बॉल’ मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल, जिथे त्यांना तीन वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर भारतीय संघ द. आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिकाही खेळेल.

पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघ सतत कठीण परिस्थितीत खेळण्याचा सराव करेल. तसेच, 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने संघाला तयार करण्यावरही व्यवस्थापनाचे लक्ष असेल.

'रो-को' चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

या कालावधीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे, पुढील तीन महिन्यांत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू आता कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर केवळ वनडे क्रिकेट खेळतील. त्यामुळे त्यांचे पुन्हा मैदानावर उतरणे पाहण्यासाठी ‘रो-को’ चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

या वर्षी मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर हे दोन्ही खेळाडू भारतीय जर्सीमध्ये खेळताना दिसलेले नाहीत. तथापि, त्यांनी आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. आता, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दीर्घ कालावधीनंतर हे दोघे भारतीय जर्सीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे उर्वरित वर्षाचे संपूर्ण वेळापत्रक

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका

  • पहिली कसोटी : 2 ते 6 ऑक्टोबर : अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)

  • दुसरी कसोटी : 10 ते 14 ऑक्टोबर : दिल्ली (अरुण जेटली स्टेडियम)

ऑस्ट्रेलिया दौरा

वनडे मालिका

  • पहिली वनडे : 19 ऑक्टोबर : पर्थ (ऑप्टस स्टेडियम)

  • दुसरी वनडे : 23 ऑक्टोबर : ॲडलेड (ॲडलेड ओव्हल)

  • तिसरी : वनडे 25 ऑक्टोबर : सिडनी (सिडनी क्रिकेट ग्राउंड)

टी-20 मालिका

  • पहिला टी-20 सामना : 29 ऑक्टोबर : कॅनबेरा (मनुका ओव्हल)

  • दुसरा टी-20 सामना : 31 ऑक्टोबर : मेलबर्न (एमसीजी)

  • तिसरा टी-20 सामना : 2 नोव्हेंबर : होबार्ट (निन्जा स्टेडियम)

  • चौथा टी-20 सामना : 6 नोव्हेंबर : गोल्ड कोस्ट (हेरिटेज बँक स्टेडियम)

  • पाचवा टी-20 सामना : 8 नोव्हेंबर : ब्रिसबेन (गाबा)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी : 14 ते18 नोव्हेंबर : कोलकाता (ईडन गार्डन्स)

  • दुसरी कसोटी : 22-26 नोव्हेंबर : गुवाहाटी (बरसापारा स्टेडियम)

वनडे मालिका

  • पहिली वनडे : 30 नोव्हेंबर : रांची (जेएससीए क्रिकेट स्टेडियम)

  • दुसरी वनडे : 3 डिसेंबर : न्यू रायपूर (शहीद विजय नारायण सिंह स्टेडियम)

  • तिसरी वनडे : 6 डिसेंबर : विशाखापट्टणम (एसीए-व्हीडीएसए क्रिकेट स्टेडियम)

टी-20 मालिका

  • पहिला टी-20 सामना : 9 डिसेंबर : कटक (बाराबती स्टेडियम)

  • दुसरा टी-20 सामना : 11 डिसेंबर : न्यू चंदीगड (मोहाली पीसीए स्टेडियम)

  • तिसरा टी-20 सामना : 14 डिसेंबर : धर्मशाला (एचपीसीए स्टेडियम)

  • चौथा टी-20 सामना : 17 डिसेंबर : लखनऊ (इकाना क्रिकेट स्टेडियम)

  • पाचवा टी-20 सामना : 19 डिसेंबर : अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT