स्पोर्ट्स

Team India Captain Change : भारतीय क्रिकेटमध्ये ‘भूकंपाचे’ संकेत! हार्दिक पंड्या टी-20चा ‘फुल टाईम’ कॅप्टन होणार

Hardik Pandya T20 captain : ज्या हार्दिक पंड्याला तंदुरुस्तीच्या कारणास्तव कर्णधारपदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यात आले होते, तोच आता BCCIसाठी तारक ठरण्याची शक्यता आहे.

रणजित गायकवाड

Team India T20 captain Change plane Hardik Pandya name ahead

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भविष्याचा विचार करून आखलेला कर्णधारपदाचा 'रोडमॅप' सध्या एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबला आहे. टीम इंडियाचा भावी 'ऑल फॉरमॅट' लीडर म्हणून ज्या शुभमन गिलकडे पाहिले जात होते, तो प्रयोग फसला असल्याचे आता स्पष्ट होत आहे. खराब फॉर्ममुळे गिलचे टी-२० मधील स्थान धोक्यात आले असून, आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवड समितीला पुन्हा एकदा नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. या शर्यतीत आता हार्दिक पंड्याचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आले आहे.

शुभमन गिलचा ‘फ्लॉप शो’ आणि निवड समितीचा मोहभंग

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने शुभमन गिलला भविष्यातील सुपरस्टार म्हणून झुकते माप दिले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गिलकडे टी-२० ची उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, ‘प्रतिष्ठेपेक्षा कामगिरी महत्त्वाची’ या गौतम गंभीर आणि आगरकर यांच्या धोरणामुळे गिलला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या १५ डावांमध्ये गिलला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये त्याने ४, ० आणि २८ धावा केल्या. या खराब कामगिरीमुळे निवड समितीचा संयम सुटला. लखनऊमध्ये झालेल्या बैठकीत गिलच्या टी-२० भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि संजू सॅमसनला सलामीला संधी देऊन बीसीसीआयने स्पष्ट संकेत दिले की, आता केवळ नावावर कोणालाही संघात स्थान मिळणार नाही.

सूर्यानंतर कोण? २०२६ च्या वर्ल्ड कपचे आव्हान

सध्या सूर्यकुमार यादव टी-२० संघाचे नेतृत्व करत आहे, पण त्याचे वय (३५ वर्षे) लक्षात घेता २०२६ चा टी-२० विश्वचषक त्याची शेवटची मोठी स्पर्धा असू शकते. २०२८ च्या वर्ल्ड कपपर्यंत सूर्या खेळण्याची शक्यता कमी असल्याने, बीसीसीआयला अशा नेतृत्वाची गरज आहे जो दीर्घकाळ संघाला सांभाळू शकेल.

इतर पर्यायांच्या मर्यादा

अक्षर पटेल : अक्षरकडे उपकर्णधारपद दिले असले तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाचा अनुभव त्याच्याकडे नाही. आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्सला त्याच्या नेतृत्वाखाली मोठी मजल मारता आली नव्हती.

जसप्रीत बुमराह : बुमराह हा सर्वोत्तम पर्याय असला तरी, वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याच्यावर टी-२० च्या नेतृत्वाची जबाबदारी टाकणे जोखमीचे ठरू शकते, कारण आगामी काळात कसोटी आणि २०२७ चा वनडे वर्ल्ड कप महत्त्वाचा आहे.

संजू सॅमसन : सॅमसन आयपीएलमध्ये यशस्वी कर्णधार असला तरी, टीम इंडियामध्ये त्याचे स्थान अद्याप स्थिर झालेले नाही.

हार्दिक पंड्या इच्छा पूर्ण होणार?

ज्या हार्दिक पंड्याला तंदुरुस्तीच्या कारणास्तव कर्णधारपदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यात आले होते, तोच आता बीसीसीआयसाठी एकमेव तारक ठरण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे मत आहे. हार्दिकने यापूर्वी १६ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. तर गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात आयपीएल चॅम्पियन बनवण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. या अष्टपैलू खेळाडूने आपल्या फिटनेसवर प्रचंड काम केले असून तो आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही भाग घेत आहे.

सध्याच्या परिस्थितीत हार्दिक हा सर्वात अनुभवी आणि प्रभावी पर्याय असल्याने, निवड समितीला आपला जुना निर्णय बदलून पुन्हा हार्दिककडे टी-२० ची धुरा सोपवावी लागू शकते.

इंग्लंड दौरा ठरणार निर्णायक

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारताला आपला नवा 'फुल टाइम' टी-२० कर्णधार जाहीर करावा लागेल. आगरकर-गंभीर जोडी आता कोणता धाडसी निर्णय घेते, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT