स्पोर्ट्स

Team India Asia Cup 2025 : भारत आशिया कपमध्ये खेळणार नसल्याचे वृत्त खोटे! BCCIने केला खुलासा

BCCI सचिव देवजित सैकिया यांनी भारतीय बोर्डाने आशिया कपमधून माघार घेण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही याची पुष्टी केली.

रणजित गायकवाड

team india not playing in asia cup bcci secretary refuses news

भारताने अगामी आशिया कप स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त खोटे असल्याचे समोर आहे. खुद्द बीसीसीआयने यावर खुलासा दिला आहे. बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सोमवारी (दि. 19) सायंकाळी सांगितले की, या वर्षी आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आयोजित केलेल्या स्पर्धांमधून भारत माघार घेईल या मुद्द्यावर अद्याप कोणतीही चर्चा किंवा निर्णय झालेला नाही. भारतीय संघ एसीसीच्या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे वृत्त निराधार आणि काल्पनिक आहे. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारी सकाळी (दि. 19) अनेक माध्यमांनी याबाबत दावा केला होता. या वृत्तांमध्ये भारत पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुष आशिया कप स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, असे म्हटले होते. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अशा कोणत्याही निर्णयाचा इन्कार केला असून, आशिया कपमधून माघार घेण्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, ‘सोमवारी सकाळी माध्यमांनी त्यांच्या वृत्तांमध्ये दावा केला की बीसीसीआयने आशिया कप आणि महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप या दोन्ही एसीसी स्पर्धांमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही कारण आतापर्यंत बीसीसीआयने एसीसीला पत्र लिहिणे तर दूरच पण या आगामी स्पर्धांबद्दल कोणतीही चर्चा किंवा निर्णय झालेला नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘सध्या आमचे संपूर्ण लक्ष आयपीएल आणि त्यानंतर होणाऱ्या इंग्लंड मालिकेवर (पुरुष आणि महिला दोन्ही) आहे. आशिया कप किंवा इतर कोणत्याही एसीसी स्पर्धेचा मुद्दा कोणत्याही स्तरावर चर्चेसाठी आलेला नाही. त्यामुळे माध्यमांनी केला दावा पूर्णपणे काल्पनिक आहे.’

पुरुषांच्या आशिया कप 2025चे आयोजन सप्टेंबरमध्ये भारताच्या यजमानपदाखाली टी-20 स्वरूपात खेळवली जाईल या स्पर्धेत यजमान भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, युएई, हाँगकाँग आणि ओमान हे संघ सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, श्रीलंका महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप 2025चे आयोजन करणार आहे. ही स्पर्धा 2023 मध्ये पहिल्यांदाच खेळवण्यात आली होती. ती स्पर्धा भारताने जिंकली होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला 31 धावांनी पराभूत करून विजेतेपद पटकावले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर वाद

भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावामुळे या स्पर्धांबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात होते. विशेषतः पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे गेल्या 15 दिवसांत जे काही घडले ते पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात होता की आता भारत क्रिकेटच्या मैदानावरही पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू इच्छित नाही. परिणामी आशिया कपच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT