स्पोर्ट्स

IND vs PAK : ‘माझ्या अ‍ॅक्शनची चर्चा म्हणजे भारत घाबरला’; पाकच्या उस्मान तारिकचे टीम इंडियाला खुले आव्हान

Usman Tariq T20 World Cup 2026 : ‘भारतीय खेळाडूंना मला खेळणे कठीण जाईल’

रणजित गायकवाड

T20 World cup 2026 Pakistan spinner Usman Tariq Challenge to Team India

कोलंबो : आपल्या अनोख्या गोलंदाजी ॲक्शनमुळे चर्चेत आलेला पाकिस्तानी फिरकीपटू उस्मान तारिक याने आगामी महामुकाबल्यापूर्वी भारतीय संघावर निशाणा साधला आहे. ‘भारतीय खेळाडूंना मला खेळणे कठीण जाईल आणि त्यांच्यावर माझे अतिरिक्त दडपण असेल,’ असा दावा तारिकने केला आहे. उस्मान तारिकची गोलंदाजीची शैली श्रीलंकेचा दिग्गज लसित मलिंगाप्रमाणे असून, चेंडू सोडण्यापूर्वी तो काही क्षण थांबतो, ज्यामुळे फलंदाज संभ्रमात पडतो.

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यापूर्वी, पाकिस्तान उस्मान तारिकला थेट भारताविरुद्ध मैदानात उतरवेल असा कयास लावला जात होता. मात्र, १० फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली. या सामन्यात पाकिस्तानने शाहीन आफ्रिदी या एकमेव वेगवान गोलंदाजासह चार फिरकीपटूंना (सईम अयूबसह) खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.

संशयास्पद गोलंदाजी शैली आणि आयसीसीची भूमिका

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तीन बळी टिपल्यानंतर, उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या वैधतेवर भारतीय चाहत्यांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तारिकच्या हाताची कोपर गोलंदाजी करताना मर्यादेपेक्षा जास्त वाकत असल्याच्या तक्रारी यापूर्वी दोनदा झाल्या आहेत. तरीही, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याला गोलंदाजी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

‘माझ्या अ‍ॅक्शनवर चर्चा म्हणजे भारताला भीती’

भारतीय चाहत्यांमध्ये होत असलेल्या चर्चेबाबत विचारले असता तारिक म्हणाला, ‘‘ज्या पद्धतीने माझ्या गोलंदाजीवर आक्षेप घेतले जात आहेत किंवा चर्चा सुरू आहे, त्यावरून असे वाटते की त्यांच्यावर अतिरिक्त दडपण आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर केवळ आक्षेप घेता, तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीला घाबरत आहात.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘मीडियामध्ये काय सुरू आहे याकडे माझे लक्ष नाही. मी केवळ माझ्या खेळावर आणि सरावावर लक्ष केंद्रित करत असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे.’’

६ फूट ४ इंच उंचीचा फिरकीपटू आणि विश्वविजयाचा निर्धार

सहा फूट चार इंच उंची असलेल्या या ऑफ-स्पिनरने १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्याबाबत अत्यंत साधी भूमिका मांडली आहे. ‘‘आपण जेव्हा रेकॉर्डबद्दल बोलतो, तेव्हा आपण केवळ पराभवाचा विचार करतो. मात्र, सुरुवातीपासूनचा इतिहास पाहिला तर आमचा रेकॉर्ड उत्तम आहे, यात अनेक जेतेपदांच्या सामन्यांचाही समावेश आहे,’’ असे त्याने नमूद केले.

आपल्या निर्धाराबद्दल बोलताना उस्मान म्हणाला, ‘‘आमचे सर्वांचे लक्ष एकाच गोष्टीवर आहे; समोर कोणताही संघ असो, आम्हाला आमचे सर्वोत्तम प्रदर्शन करायचे आहे. आम्हाला हा विश्वचषक जिंकायचा असून तो सर्वांसाठी संस्मरणीय बनवायचा आहे. भारताविरुद्धच्या सामन्याचे अनावश्यक ओझे न घेता, आखलेल्या रणनीतीनुसार खेळणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.’’

उस्मान तारिकच्या अ‍ॅक्शनवर आर अश्विनचे मोठे विधान

पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील सामन्यानंतर पाकिस्तानी फिरकीपटू उस्मान तारिक याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून मोठा गदारोळ माजला आहे. तारिकच्या 'विचित्र' अ‍ॅक्शनवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी आक्षेप घेतला असतानाच, भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रवीचंद्रन अश्विन याने या वादात उडी घेत आपली परखड भूमिका मांडली आहे.

‘अंपायरला जज करणे अशक्य’

अश्विनने आपल्या 'एक्स' अकाउंटवरून या प्रकरणाचे तांत्रिक विश्लेषण केले आहे. त्याने प्रामुख्याने तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. तारिकची अ‍ॅक्शन नियमात बसते की नाही, हे केवळ 'आयसीसी बॉलिंग अ‍ॅक्शन टेस्टिंग सेंटर'मध्येच स्पष्ट होऊ शकते. केवळ टीव्हीवर पाहून कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. गोलंदाजी करताना हात १५ अंशांपेक्षा जास्त वाकू नये असा नियम आहे. अश्विनच्या मते, मैदानावरील पंचांना उघड्या डोळ्यांनी एखादा गोलंदाज १५ डिग्रीच्या मर्यादेत आहे की नाही, हे ओळखणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. तारिक चेंडू टाकण्यापूर्वी काही काळ थांबतो. यावर अश्विन म्हणाला, ‘जर तो क्रीजवर थांबत असेल, तर मला वाटतं ते पूर्णपणे कायदेशीर आहे, कारण ती त्याची नियमित गोलंदाजी करण्याची शैली आहे.’

‘अस्पष्टतेचा फायदा घेऊ नका’

अश्विनने पुढे असेही नमूद केले की, जोपर्यंत 'रियल टाइम कॉम्पिटिशन टेस्टिंग टूल' उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अशा गोष्टी अस्पष्ट राहतील. केवळ अस्पष्टतेचा फायदा घेऊन कोणत्याही खेळाडूवर विनाकारण आरोप करणे चुकीचे असल्याचे मत त्याने व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT