T20 World Cup 2026
कोलंबो : टी२० विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी (दि. २१) होणारा 'सुपर ८' सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला. या महत्त्वाच्या सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) नसल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देऊन सामना गुंडाळण्यात आला. या निकालामुळे आता पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या प्रवेशाचे गणित अधिकच कठीण झाले आहे.
पाकिस्तानचे स्पर्धेतील दोन सामने अद्याप शिल्लक असून त्यांना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्याशी सामना करायचा आहे. सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील संघाने जर हे दोन्ही सामने जिंकले, तर ५ गुणांसह ते उपांत्य फेरीत स्थान निश्चित करू शकतात. मात्र, जर यापैकी एक सामना गमावला आणि एक जिंकला, तर ३ गुणांसह त्यांना इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. दोन्ही सामने हरल्यास पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येईल.
शनिवारी पाकिस्तान- न्यूझीलंड सामन्याची सुरुवात पावसाच्या हलक्या सरींनी झाली होती. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, बघता बघता पावसाचा जोर वाढल्याने एकही चेंडू न खेळता सामना रद्द करावा लागला.या सामन्यासाठी पाकिस्तानने संघात एक बदल करत ख्वाजा नफेच्या जागी फखर जमानला संधी दिली होती. दुसरीकडे, न्यूझीलंडने तीन बदल केले. पोटाच्या त्रासामुळे मागील सामना न खेळलेला कर्णधार मिचेल सँटनर संघात परतला, तर लॉकी फर्ग्युसन आणि ईश सोधी यांनाही अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले होते.
या पावसामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांची स्थिती 'सुपर ८' फेरीत अधिक कठीण झाली आहे. कोलंबोतील हवामान पाहता, आगामी सामन्यांतही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत पुढील सामने जिंकणे अनिवार्य असून, पराभव किंवा पावसामुळे होणारा निकाल त्यांच्या उपांत्य फेरीच्या स्वप्नाला तडाखा देवू शकतो. पाकिस्तान आपला पुढचा सामना २४ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे, तर न्यूझीलंड २५ फेब्रुवारीला यजमान श्रीलंकेशी भिडणार आहे.