स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 Final| कव्हर्स हटवले; भारतासह न्यूझीलंडचेही टेन्शन वाढणार! कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी?

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारताच्या भूतकाळातील कटू स्मृती क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजही कायम

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्‍टेडियमवरील खेळपट्टी दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळेच आता कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मिचेल सँटनर यांच्यासमोर संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.

T20 World Cup 2026 Final Pitch Report

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलची तयारी पूर्ण झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या मोठ्या सामन्यासाठी खेळपट्टीवरील कव्हर्स हटवण्यात आले असून मैदान सज्ज झाले आहे. मात्र, अहमदाबादची ही खेळपट्टी दोन्ही संघांसाठी टेन्शन वाढवणारी ठरू शकते. विशेषतः या मैदानावरील भारताचा जुना रेकॉर्ड पाहता भारतीय चाहत्यांच्या मनात थोडी धाकधूक आहे. जाणून घेऊया अहमदाबादच्या खेळपट्टीविषयी...

दोन्ही संघांच्या कर्णधारांसमोर संघ निवडीचे मोठे आव्हान

२०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दिमाखात धडक मारली होती. भारतच विश्वविजेता ठरणार, असा संघाचा खेळ होता. समोर होती ऑस्ट्रेलियाची टीम. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली आणि कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांसाठी ही फायनल एक कटू स्मृती बनली. यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा एकमेव पराभव झाला आहे. तोही याच मैदानावर समोर होती दक्षिण आफ्रिकेची टीम. या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील खेळपट्टी दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळेच आता कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मिचेल सँटनर यांच्यासमोर संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.

कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम सामना होणारी खेळपट्टी या स्पर्धेतील सर्वात 'फ्लॅट' (सपाट) खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. उपांत्य फेरीत धावांचा पाऊस पडल्यानंतर आता अंतिम सामन्यासाठी फलंदाजीला पोषक आणि चांगला बाऊन्स असलेली खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. यामुळे आक्रमक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

फिरकीपटूंसाठी धोक्याची घंटा

असे मानले जात आहे की, अहमदाबाद हे फिरकीपटूंसाठी सर्वात कठीण मैदान ठरले आहे. येथील आकडेवारी फिरकीपटूंसाठी चिंताजनक आहे. येथे स्पर्धेत एकूण ६ सामने झाले. यामध्ये फिरकीपटूंनी ८० षटकांत केवळ २१ बळी घेतले आहेत. फिरकीपटूंची सरासरी ३५.५७ आणि इकॉनॉमी रेट ९.३३ राहिला आहे, जो स्पर्धेतील इतर कोणत्याही मैदानापेक्षा जास्त आहे. या स्टेडियमवरील १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये फिरकीपटूंनी ३८.२७ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

कुलदीप की वरुण? भारतासमोर पेच

खेळपट्टीच्या या स्वरूपामुळे फिरकीपटूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरुण चक्रवर्तीचा फॉर्म आणि कुलदीप यादवला संघात स्थान द्यायचे की नाही, यावरून भारतीय संघ व्यवस्थापनात खल सुरू आहे. सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने फिरकीचा वापर अत्यंत कमी केला होता. दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरलाही या मैदानावर फारसे यश मिळालेले नाही. त्याने येथे खेळलेल्या दोन सामन्यांत एकही बळी घेतलेला नाही.

मोठ्या धावसंख्येची शक्यता

अंतिम सामना होणारी खेळपट्टी या स्पर्धेतील सर्वात 'फ्लॅट' (सपाट) खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेंडू बॅटवर थेट येईल. यामुळे मोठ्या धावसंख्येची शक्यता आहे. फिरकीपटूंना साथ मिळणे कठीण आहे. त्यामुळे दोन्ही संघांसमोर धावगती रोखण्याचे मोठे आव्हान असेल. फलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांची आतिषबाजी होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT