लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आतापर्यंत आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचाच पुनरुच्चार केला असला तरी त्यांची ही धमकी आता निव्वळ वल्गनाच ठरण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा कोणताही विचार नसून उलटपक्षी ते 2 फेब्रुवारी रोजी पहाटे कोलंबोला रवाना होण्याच्या मार्गावर आहेत.
या स्पर्धेवर किंवा 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे, असा या सूत्राचा दावा आहे. सूत्रांनी सांगितले की, भारतात खेळण्याबाबत बांगला देश क्रिकेट बोर्डाने चिंता व्यक्त केली, त्याला पीसीबीचा पूर्ण पाठिंबाच होता. मात्र, आता स्वत: बहिष्कार टाकण्याचा प्रश्न आला, त्यावेळी पीसीबीने बांगला देशची पाठराखण करत बसण्याऐवजी स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग घेणे पसंत केले आहे.
बीसीसीआय, पीसीबी आणि आयसीसी यांच्यात यापूर्वी एक त्रिपक्षीय करारही झाला असून त्यानुसार, 2027 पर्यंत आयसीसी स्पर्धांमधील भारत-पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने लंकेतच खेळवले जाणार आहेत. अगदी ते फायनलमध्ये पोहोचले तर फायनलदेखील लंकेतच होईल. मग ते कोणत्या आधारे स्पर्धेवर किंवा भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकतात, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो आहे.
अगदी दस्तुरखुद्द पाकिस्तान क्रिकेट मंडळ याबाबत शुक्रवारी (दि. 30) आपली अधिकृत भूमिका जाहीर करत स्पर्धेच्या सहभागावर शिक्कामोर्तब करू शकते, असेही संकेत आहेत. जेव्हा पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, विचाराधीन असलेले सर्व पर्याय पाकिस्तान क्रिकेटचे समृद्ध भविष्य सुनिश्चित करणारे असावेत आणि आयसीसी व सदस्य बोर्डांशी चांगले संबंध कायम ठेवणारे असावेत, असे सूत्राने यावेळी नमूद केले.