Pakistan cricket controversy
इस्लामाबाद : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. पाकिस्तानचा संघ 'सुपर-८' टप्प्यातूनच बाहेर पडला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) खेळाडूंवर दंड आकारू शकते, असे दावे काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आले होते. मात्र, आता पीसीबीचे प्रवक्ते आमिर मीर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भूमिका स्पष्ट केली आहे.
नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. संघाचे आव्हान सुपर-८ टप्प्यातच संपुष्टात आले होते. यानंतर खेळाडूंवर दंडात्मक कारवाईच्या चर्चांना उधाण आले होते, परंतु पीसीबी प्रवक्त्यांनी हे दावे फेटाळून लावत बोर्डाची भूमिका स्पष्ट केली आहे.
आमिर मीर यांनी सांगितले की, "कोणत्याही खेळाडूवर अद्याप दंड आकारण्यात आलेला नाही. मात्र, बोर्ड खेळाडूंसाठी एक नवीन रणनीती तयार करण्यावर विचार करत आहे. कारण चांगली कामगिरी केल्यावर खेळाडूंना मोठे प्रोत्साहन (इन्सेंटिव्ह) मिळते." मीर यांनी पुढे माहिती दिली की, आता प्रत्येक खेळाडू वर्षाला सुमारे ६ ते ७ कोटी पाकिस्तानी रुपये कमावतो, त्यामुळे त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना जबाबदार धरण्याबाबत बोर्ड गांभीर्याने विचार करत आहे.
सुपर-८ मध्ये पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला.न्यूझीलंडविरुद्धचा सुपर-८ सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.: उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध एकतर ६४ धावांनी किंवा १३.१ षटकांत विजय मिळवणे आवश्यक होते.या सामन्यात पाकिस्तानने २१२ धावा केल्या, पण प्रत्युत्तरात श्रीलंकेनेही २०७ धावा कुटल्या. परिणामी, चांगल्या 'नेट रनरेट'च्या जोरावर न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. २०२३ चा वनडे विश्वचषक, २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी यानंतर पाकिस्तान सलग चौथ्या आयसीसी (ICC) स्पर्धेच्या बाद फेरीत (नॉकआउट) पोहोचण्यास अपयशी ठरला आहे.