

यंदाच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.
Shahid Afridi on PCB fine controversy
कराची : टी-२० विश्वचषकात अपेक्षेप्रमाणेच पाकिस्तान संघाने नामुष्कीजनक कामगिरी केली आहे. मागील काही वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेटची वाटचाल ही रसातळाला सुरू आहे. यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डला शहाणपण आले नाही. संघात सुधारणा करण्याऐवजी विश्वचषकातील सुमार कामगिरी करणार्या खेळाडूंना ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रस्तावच मांडला आहे. आता या प्रस्तावावर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच सुमार कामगिरी करणार्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जाणून घेऊया शाहिद आफ्रिदीने नेमकी कोणती मागणी केली याविषयी....
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, सुमार क्रिकेट खेळणार्या पाकिस्तानच्या संघात फेरबदल करण्याऐवजी प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रस्ताव ही कोती वृत्ती आहे. हा निर्णय अनाकलनीय आहे. ५० लाख रुपयांच्या दंडाने काय होणार? माझ्या मते हा काही शिक्षा करण्याचा मार्ग नाही."
केवळ दंड न आकारता क्रिकेट रचनेत सुधारणा करण्याची गरज आफ्रिदीने व्यक्त केली. त्याने सुचवलेले काही प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे ....
ज्या खेळाडूंनी विश्वचषकात सुमार कामगिरी केली, त्यांना तातडीने संघातून डच्चू देऊन देशांतर्गत स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळायला पाठवावे.
संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांना किमान दोन वर्षे तरी पुन्हा पाकिस्तान संघात स्थान देऊ नये, अशी आफ्रिदीने मागणी केली आहे.
खेळाडूंमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांना योग्य विश्रांती द्या आणि त्यांच्या कामाच्या ताणाचे नियोजन करा, हीच खरी शिक्षा असेल.
यंदाच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर इंग्लंडच्या संघानेही चारीमुंड्या चित केले. सुपर-८ फेरीतील न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर श्रीलंकेविरुद्ध विजय मिळाला; मात्र तत्पूर्वी खूप उशीर झाला होता. उपांत्य फेरीत पोहोचण्याचे पाकिस्तानचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. दरम्यान, विश्वचषकातील सुमार कामगिरीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रत्येक खेळाडूवर ५० लाख रुपयांचा दंड आकारण्याच्या तयारीत आहे. मात्र, आता शाहिद आफ्रिदीने केलेल्या विधानानंतर दंडापेक्षा खेळाडूंची जबाबदारी, निवड प्रक्रियेतील सुधारणा आणि दीर्घकालीन उपाययोजना करणार का, याकडे देशातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.