स्पोर्ट्स

IND vs PAK : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यावर मोठे संकट..! श्रीलंकेकडून धोक्याचा इशारा

T20 World Cup 2026 IND vs PAK : सामना रद्द होण्याच्या भीतीने क्रिकेटप्रेमींचा जीव टांगणीला

रणजित गायकवाड

IND vs PAK High Voltage Clash Under Threat Sri Lanka Issues Warning

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात बहुप्रतिक्षित असा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना येत्या रविवारी (१५ फेब्रुवारी) कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. मात्र, या हायव्होल्टेज लढतीपूर्वीच श्रीलंकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे क्रिकेटप्रेमींच्या चिंतेत भर पडली आहे.

दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची लढत

विश्वचषकाच्या 'गट-अ' मधील हा महत्त्वपूर्ण सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंतचे दोन्ही सामने अत्यंत दिमाखात जिंकून आपला दबदबा निर्माण केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने नेदरलँड्सविरुद्ध निसटता विजय मिळवल्यानंतर अमेरिकेवर मात करत आपले आव्हान कायम राखले आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 'सुपर-८' फेरीसाठी आपले स्थान निश्चित करेल. अशा निर्णायक टप्प्यावर पावसाने व्यत्यय आणल्यास समीकरणे बदलू शकतात.

हवामान विभागाचा नेमका इशारा काय?

श्रीलंकेच्या हवामान विभागाने जारी केलेल्या विशेष बुलेटिननुसार, १५ फेब्रुवारीच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. 'नॅचरल हॅझर्ड्स अर्ली वॉर्निंग सेंटर'ने १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता नोटीस जारी करून नागरिकांना व प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

केवळ स्थानिक विभागच नव्हे, तर 'अ‍ॅक्युवेदर' या जागतिक हवामान संस्थेनेही १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये ९३ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. ही आकडेवारी खेळाडू आणि चाहत्यांसाठी निराशाजनक मानली जात आहे.

सामन्याच्या वेळी परिस्थिती सुधारण्याची आशा

जरी दिवसा पावसाचा जोर जास्त असला, तरी सामन्याच्या वेळेपर्यंत हवामानात सुधारणा होईल, अशी चिन्हे आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. अ‍ॅक्युवेदरच्या अहवालानुसार, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्के असेल, ज्यामुळे टॉसला विलंब होऊ शकतो.

मात्र, सामना सुरू होण्याच्या वेळेपर्यंत पावसाचे प्रमाण केवळ ९ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल आणि तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पावसाचा धोका असला तरी, नियोजित वेळेपेक्षा थोड्या विलंबाने का होईना, पण पूर्ण षटकांचा खेळ व्हावा अशीच अपेक्षा जगभरातील क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT