स्पोर्ट्स

IPL 2025 Suryakumar Yadav : सूर्याचा नवा विश्वविक्रम, सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला इतिहास

सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक वेळा एका डावात 25 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. एवढेच नाही तर त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला.

रणजित गायकवाड

IPL 2025 Suryakumar Yadav breaks Sachin Tendulkar s 15 year old record

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या दुसऱ्या हंगामातही धावांचा वर्षाव सुरूच ठेवला आहे. आयपीएल 2025 मध्ये खराब सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या आणि प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या मुंबईला या पातळीवर नेण्यात सूर्यकुमार यादवच्या दमदार फलंदाजीने मोठी भूमिका बजावली. लीगच्या शेवटच्या सामन्यातही हीच कामगिरी कायम ठेवून सूर्याने विश्वविक्रम नोंदवला आहे. सूर्यकुमार यादवने टी-20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक वेळा एका डावात 25 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. एवढेच नाही तर त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला.

सोमवारी (दि. 26) जयपूर येथे आयपीएलच्या 69 व्या सामन्यात मुंबई आणि पंजाब किंग्ज आमनेसामने होते. दोन्ही संघांसाठी या हंगामातील लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना होता. तसेच, प्लेऑफमध्ये पहिले किंवा दुसरे स्थान मिळवण्याच्या दृष्टीने ही मोठी लढत होती. अशा परिस्थितीत, मुंबईला त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या फलंदाजाकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा होती आणि सूर्यकुमार यादवनेही संघाला निराश केले नाही. गेल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावून संघाला प्लेऑफमध्ये नेणाऱ्या सूर्याने यावेळीही दमदार खेळ केला आणि संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सूर्याचा नवा विश्वविक्रम

सहाव्या षटकात पहिली विकेट पडल्यानंतर मुंबईचा उपकर्णधार सूर्या मैदानावर आला आणि त्याने येताच चौकार मारून धावा काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान, सूर्याने 9व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, ज्यामुळे त्याची धावसंख्या 22 धावांवरून 26 धावांवर पोहोचली. सूर्याने या एका चौकाराने इतिहास रचला.

भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सलग 14 व्या डावात 25 धावांचा टप्पा ओलांडला. यासह, त्याने द. आफ्रिकेचा माजी टी-20 कर्णधार टेम्बा बावुमाला मागे टाकत एक नवा विश्वविक्रम रचला. एवढेच नाही तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजाने लीग टप्प्यातील प्रत्येक सामन्यात 25 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला.

सचिनला मागे टाकत, कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

एवढेच नाही तर सूर्याने या चौकारासह 605 धावांचा टप्पा गाठला आणि आयपीएलच्या इतिहासातील त्याच्या सर्वोच्च धावसंख्येशी बरोबरी केली. यापूर्वी, सूर्याने आयपीएल 2023 मध्ये 605 धावा केल्या होत्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. पण या हंगामात सूर्याने त्यालाही मागे टाकले. विशेष म्हणजे त्याने मुंबईचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. सचिनने 2010 च्या हंगामात 618 धावा केल्या होत्या, ज्या आयपीएलच्या गेल्या 17 हंगामात मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा होत्या. सूर्याने हा विक्रम मागे टाकत 650 धावांपर्यंत मजल मारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT