हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकतेच २ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या नावावर केले. यासह टीम इंडियाने आयसीसी करंडक न जिंकण्याचा अनेक वर्षांपासूनचा दुष्काळही संपुष्टात आणला.
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीने सुमारे ४० कोटी, तर बीसीसीआयने ५१ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. याव्यतिरिक्त, विविध नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनीही आपापल्या राज्यातील खेळाडूंसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारताचे माजी दिग्गज खेळाडू गावस्कर यांनी महिला संघातील खेळाडूंना एक मोठा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.
गावस्कर म्हणाले की, ज्यांनी-ज्यांनी विश्वविजेत्या खेळाडूंना जी काही आश्वासने दिली आहेत आणि जी बक्षिसे देण्याचे जाहीर केले आहे, ती जर मिळाली नाहीत, तर खेळाडूंनी निराश होऊ नये. गावस्कर यांच्या मते, ‘हे निर्लज्ज लोक केवळ तुमच्या विजयाचा फायदा घेऊन स्वतःचे प्रमोशन करत आहेत.’
सुनील गावस्कर यांनी ‘मिड-डे’ वृत्तपत्रातील त्यांच्या स्तंभ लेखात ही टीप्पणी केली आहे. ते पुढे म्हणतात की, ‘टीम इंडियाच्या महिला खेळाडूंना एक छोटासा इशारा आहे. जर तुम्हाला जाहीर केलेली काही बक्षिसे मिळाली नाहीत, तर त्यामुळे निराश होऊ नका.’
भारतीय संघाने एखादी मोठी ट्रॉफी जिंकल्यानंतर आपल्या देशात जाहिरातदार, विविध ब्रँड्स आणि राजकीय लोक तत्काळ या विजया फायदा उचलण्यासाठी पुढे सरसावतात. ही शर्यत खेळाडूंना भुलवणारी असते. पण खेळाडूंनी एक बाब लक्षात ठेवावी की, तुमच्या विजयाच्या माध्यमातून हे सर्व लोक स्वतःची मोफत प्रसिद्धी साधण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही संघाचे अभिनंदन करणाऱ्या फुल-पेज जाहिराती आणि होर्डिंग्जवर एक नजर टाकली, तर त्यातून स्पष्ट होते की ते केवळ आपल्या ब्रँडचा, स्वतःचा प्रचार करण्यात मग्न आहेत. मात्र हे करत असताना ते भारतीय क्रिकेटला गौरव मिळवून देणाऱ्यांना काहीही देत नाहीत.’
गावस्कर यांनी भारतीय महिला संघाला हा इशारा त्यांच्या खासगी अनुभवाच्या आधारावर दिला आहे. १९८३ मध्ये जेव्हा भारतीय संघाने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, तेव्हा त्यांच्यासमोरही अनेक आश्वासने देण्यात आली होती, जी आजही पूर्ण झालेली नसल्याचा खुलासा त्यांच्या लेखाच्या माध्यमातून केला आहे.
गावस्कर म्हणाले, ‘१९८३ च्या संघालाही अनेक आश्वासने देण्यात आली होती आणि माध्यमांनी त्यांना भरपूर प्रसिद्धी दिली होती. मात्र, त्यातील जवळपास कोणतीही आश्वासने कधीही पूर्ण झाली नाहीत. माध्यमांना दोष देता येणार नाही, कारण मोठ्या-मोठ्या घोषणांमुळे त्यांना बातम्यांसाठी खाद्य मिळाले. पण त्यांना हे माहीत नव्हते की हे निर्लज्ज लोक माध्यमांचाही वापर करत आहेत. त्यामुळे, महिला खेळाडूंनो, जर हे निर्लज्ज लोक तुमच्या विजयाचा उपयोग स्वतःच्या प्रचार करण्यासाठी करत असतील, तर काळजी करू नका.’