Steve Smith Melbourne Pitch: मेलबर्न कसोटीत दोन दिवसात ३६ विकेट्स पडल्या. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीत २० बळी घेणाऱ्या या पीचबाबत आता चर्चा होऊ लागली आहे. पराभूत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत काय अडचणी आल्या याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ही कसोटी इंग्लंडने चार विकेट्स राखून जिंकली. जरी ऑस्ट्रेलियाने आधीच्या तीन कसोटी जिंकून मालिका खिशात टाकली असली तरी मेलबर्नवरचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरणार आहे.
स्टीव्ह स्मिथने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या पीचवर 10 MM गवत ठेवण्यात आल्याचं सांगितलं. तो म्हणाला, 'सुरूवातीला ही खेळपट्टी खूप संथ होती. या खेळपट्टीचे नेचर एक्सप्लेन करणं कठीण आहे. टेनिस बॉल बाऊन्स नव्हता. हे असं खेळपट्टीत असलेल्या आद्रतेमुळं असेल.'
स्मिथ पुढे म्हणाला, 'मला वाटतं गवताची जाडी याला कारणीभूत आहे. चेंडू ग्रासवर बसूनच आहे असं वाटत होतं. पहिल्या डावात चेंडू थांबून येत होता. त्यामुळं तो ड्राईव्ह करता येत नव्हता. चेंडू खूप थांबून येत होता.'
स्मिथ म्हणाला या खेळपट्टीवर चेंडू खूपच सीम होत होता. यामुळ फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावणे शक्य होत नव्हतं. तो म्हणाला, 'खेळपट्टी खूपच अवघड होती. कोणालाही खेळपट्टीवर थांबता येत नव्हतं. ज्यावेळी दोन दिवसात ३६ विकेट्स पडतात. त्या जरा जास्तच आहेत.'
स्मिथने खेळपट्टीवर जर कमी उंचीचं गवत असतं तर बरं झालं असतं असं देखील सुचवलं. तो म्हणाला, 'त्यांना जेवढ्या उंचीचं गवत खेळपट्टीवर ठेवायचं होतं त्यापेक्षा जरा जास्तच होतं. जर आम्ही ते 8 MM पर्यंत ठेवलं असतं तर ते योग्य झालं असतं.'
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने देखील कसोटी सामना दोन दिवसात संपण्यावर आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला की दोन दिवसात कसोटी सामना संपणे हे कोणालाही नको असतं. तो म्हणाला, 'आम्ही ज्यावेळी खेळपट्टीवर गेलो आम्ही त्या परिस्थितीला सामोरे गेलो. तुम्हाला या परिस्थितीशी जुळवून घ्यावच लागतं. मात्र खरं सांगयाचं झालं तर अशी खेळपट्टीवर तुम्ही खेळू इच्छित नसता.'