Brijesh Solanki Kabaddi Player Death Case
मेरठ : कबड्डीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्यांना आपल्या ताकदीने आणि चपळाईने धूळ चारणारा एक उदयोन्मुख खेळाडू, एका कुत्र्याच्या चाव्यापुढे हतबल ठरला. राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेता आणि प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या 22 वर्षीय ब्रिजेश सोलंकी याचा रेबीजमुळे झालेला मृत्यू, सर्वांच्या मनाला चटका लावून गेला आहे. एका भटक्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेली एक किरकोळ जखम त्याच्या मृत्यूचे कारण ठरेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
ही दुर्दैवी घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडली. ब्रिजेशने गटारात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढले. या प्रयत्नात त्या पिल्लाने ब्रिजेशच्या हाताला हलकासा चावा घेतला. जखम किरकोळ असल्याने आणि खेळाडूंना सरावादरम्यान लहान-मोठ्या दुखापती होतच असल्याने ब्रिजेशने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याचे प्रशिक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, ‘ब्रिजेशने हाताला झालेल्या जखमेकडे कबड्डीतील सामान्य दुखापत समजण्याची चूक केली. कुत्र्याच्या पिल्लाचा चावा अगदीच छोटा होता, त्यामुळे त्याने ते गांभीर्याने घेतले नाही आणि रेबीज प्रतिबंधक लस घेण्याचे टाळले.’
पण त्या एका क्षुल्लक वाटणाऱ्या चुकीची ब्रिजेशला फार मोठी किंमत मोजावी लागली. सुमारे दोन महिन्यांनंतर, 26 जून रोजी सरावादरम्यान ब्रिजेशला हातामध्ये बधिरपणा जाणवू लागला. त्याची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. त्याला आधी जिल्हा रुग्णालयात आणि नंतर नोएडातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्याच्या मोठ्या भावाने, संदीप कुमार याने सांगितले, ‘अचानक तो पाण्याला घाबरू लागला. त्याच्यात रेबीजची सर्व लक्षणे स्पष्ट दिसू लागली होती. आम्ही त्याला घेऊन खुर्जा, अलीगढ आणि अगदी दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वणवण फिरलो, पण सर्वत्र आम्हाला नकार मिळाला. अखेरीस नोएडातील डॉक्टरांनी त्याला रेबीजचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली.’
नियतीचा खेळ मात्र वेगळाच होता. आधुनिक वैद्यकीय उपचारांची आशा मावळत असताना, हताश झालेल्या कुटुंबीयांनी त्याला मथुरेतील एका देवऋषीकडे उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, वाटेतच शनिवारी (दि. 28) ब्रिजेशची प्राणज्योत मालवली.
फराणा गावातील तीन भावांमध्ये सर्वात लहान असलेल्या ब्रिजेशच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 30) गावाला भेट दिली. आरोग्य विभागाने तातडीने 29 गावकऱ्यांचे लसीकरण केले असून, रेबीजबाबत एक व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कुमार डोहरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘कुत्रा, माकड किंवा इतर कोणताही प्राणी चावल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी आणि आवश्यक उपचार घ्यावेत.’ त्यांनी सांगितले की, ब्रिजेशमध्ये ‘हायड्रोफोबिया’ (पाण्याची भीती) सारखी रेबीजची स्पष्ट लक्षणे होती, मात्र मृत्यूच्या नेमक्या कारणाची पुष्टी चाचणी अहवालानंतरच होईल.
एका उदयोन्मुख खेळाडूचा असा दुर्दैवी अंत, केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण क्रीडाविश्वासाठी एक मोठा धक्का आहे. एका क्षुल्लक वाटणाऱ्या चुकीमुळे आणि जागरूकतेच्या अभावामुळे एक तेजस्वी कारकीर्द अकाली संपुष्टात आली. ब्रिजेशची ही कहाणी, प्राण्यांवरील दया आणि स्वतःच्या आरोग्याविषयीची जागरूकता यात संतुलन साधणे किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देणारी ही एक दुःखद घटनाच म्हणावी लागेल.