

मुंबई : भटके श्वान आणि मांजरी या समुदाय प्राण्यांना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा आहे. तशी मार्गदर्शन तत्व मुंबई महानगरपालिकेने जारी केली आहेत. या मार्गदर्शन तत्वामध्ये पाळीव श्वानासंदर्भात निश्चित करण्यात आलेले कर भरणे व पाळीव प्राण्यांच्या परवानासंदर्भातील नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.
सुप्रीम कोर्ट व भारतीय प्राणी कल्याण मंडळांच्या निर्देशांनुसार, मालक, अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींसाठी पाळीव व भटक्या प्राण्यांसंदर्भात मुंबई महापालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महापालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या https://vhd.mcgm.gov.in/ संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध करण्यात आली आहेत. पाळीव प्राण्यांचे मालक, प्राण्यांना अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सध्या अनेक नागरिक पाळीव श्वानांना सहचर म्हणून ठेवतात. त्याशिवाय प्राणिमित्र, सामाजिक संस्था भटक्या श्वानांची देखभाल, उपचार आणि अन्न पुरवठा करून संवेदना व्यक्त करतात. मात्र, अनेकवेळा पाळीव प्राणी मालक, भटक्या प्राण्यांचे काळजीवाहक, निवासी कल्याण संस्था व गृहनिर्माण संस्था यांच्यात मतभेद आणि संघर्ष निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याचे पालिकेचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
* सार्वजनिक ठिकाणी भटक्या प्राण्यांना खायला घालताना स्वच्छ आहार पद्धतींचा वापर करावा.
* रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर जेव्हा वाहन नागरिकांची रहदारी कमी असते तेव्हा श्वान व मांजरांना खायला देणे.
* लोकवस्तीच्या ठिकाणांपासून दूर आहार देणे. घराजवळ मुलांची खेळण्याची जागा, सार्वजनिक चालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागी भटक्या श्वानाना खायला देऊ नये.
* भटक्या कुत्र्यांना देण्यासाठी बायोडिग्रेडेबल/डिस्पोजेबल कटलरी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
* रस्त्यावरील प्राण्यांना खायला घालण्यास मनाई करणारा कोणताही कायदा नाही.
* पाळीव कुत्र्यासाठी लिफ्ट किंवा लिफ्ट वापरण्यास मनाई करू शकत नाहीत. सोयीस्करपणे प्रवेशयोग्य असलेल्या इमारतीत एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास पर्यायी लिफ्ट वापरण्याचा सल्ला देण्याचा अधिकार सोसायट्यांना आहे.
* बागेत किंवा उद्यानात पाळीव प्राण्यांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करणे अदूरदर्शी आहे.
* पाळीव प्राण्यांच्या मालकाला धमकावणे कायद्याचे उल्लंघन ठरेल.
* प्राण्यांवरील क्रूरता हा गुन्हा आहे. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ आणि बीएनएसच्या कलम ३२५ अंतर्गत, तो कारावास आणि दंडासह दंडनीय गुन्हा आहे.