

Dombivli Stray Dog Attack News:
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. आक्रमक झालेली कुत्र्यांची टोळकी दिवसाढवळ्या पादचारी वृद्ध, शाळकरी विद्यार्थ्यांसह घरासमोर खेळणाऱ्या बालकांवर हल्ला करून त्यांना जखमी करत आहेत.
मंगळवारी (दि.24) रोजी सकाळच्या सुमारास पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव-रेतीबंदर रोडला असलेल्या शिव मंदिराजवळच्या बेबीबाई निवास समोर असाच प्रकार घडला. या परिसरातील चार-पाच भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने घरासमोर खेळणाऱ्या बालकावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले. हा सारा प्रकार तेथील एका इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
भटक्या कुत्र्यांनी रस्त्यावर पडलेल्या बालकाला फरफटत नेत त्याच्या हाता-पायाला कडाडून चावे घेतले. जीवाच्या आकांताने बालक ओरडू लागले. हे पाहून तेथून जाणाऱ्या पादचाऱ्याने कुत्र्यांच्या तावडीतून बालकाची सुटका केली. दगडफेक केल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने तेथून पळ काढला. कुत्र्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या बालकाला नीट उभेही राहता येत नव्हते. ज्या ठिकाणी घटना घडली तेथील बेबीबाई निवासमधील रहिवासी अनिकेत शरद गायकवाड यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात कुत्र्यांची दहशत वाढली आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या गंभीर समस्येवर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्या भागात भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक उपद्रव
डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर, महाराष्ट्रनगर, गोपीनाथ चौक, मोठागाव, कोपर, आदी भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. तर पूर्वेकडील फडके क्रॉस बापूसाहेब जोशी पथावरील एका अरूंद रस्त्यावर दोन पिसाळलेली भटकी कुत्री नेहमी पादचाऱ्यांचा पाठलाग करत असतात. यापूर्वी अनेकांना या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत.
रात्रीच्या सुमारास लोकलमधून उतरून परतणाऱ्या नोकरदारांसह रिक्षावाल्यांना अशा भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी आणि पालक रस्त्याने ये-जा करत असतात. अधिक संख्येने रस्त्याने जातात. त्यांना भटक्या कुत्र्यांच्या झुंडींचा सर्वाधिक उपद्रव आहे. केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे वैद्यकीय आरोग्य विभागाला सूचना वजा आदेश द्यावेत, अशी मागणी त्रस्त कल्याण-डोंबिवलीकरांकडून करण्यात येत आहे.
चिकन, मटण दुकानातील टाकाऊ कचरा ठरतोय कारणीभूत?
चिकन, मटण, मासळी विक्रेत्यांच्या टाकाऊ कचऱ्यावर भटकी कुत्री तुटून पडतात. मांसाहारामुळे भटकी कुत्री आणखी आक्रमक होऊ लागलीयेत, असा दावा नागरिक करतायंत. दररोज मांसाहार करणारी कुत्री निर्ढावलेली असतात. त्यामुळे शिकार म्हणून लहान बालकांना अशी कुत्री लक्ष्य करतात.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात जवळपास ८० हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या वर्षभरात सुमारे १४ हजार जणांना श्वान दंश झाल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे दर महिन्याला सरासरी ९०० ते १००० लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. केडीएमसीने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करावे, अशी मागणी उपद्रवी कुत्र्यांच्या उपद्व्यापांमुळे हैराण झालेल्या रहिवाशांकडून केली जात आहे.