स्पोर्ट्स

SL vs BAN Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बांगला देशचे निर्विवाद वर्चस्व : नजमूल-रहिमची 247 धावांची भागीदारी

श्रीलंकेच्या गोलंदाजीतील बदलांमध्ये आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या काही चुकांचा बांगला देशच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला.

रणजित गायकवाड

गॅले : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगला देशने यजमानांवर संपूर्णपणे वर्चस्व गाजवले. नजमूल हुसेन शांटो आणि मुशफिकूर रहिम या जोडीने झळकावलेल्या शानदार शतकांच्या बळावर बांगला देशने दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 3 बाद 292 धावांपर्यंत मजल मारली. शांटो 136 धावांवर, तर मुशफिकूर 105 धावांवर नाबाद असून, या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 247 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला अत्यंत मजबूत स्थितीत आणले आहे.

गॅलेच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार शांटोचा निर्णय सुरुवातीला आत्मघातकी ठरतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अवघ्या 45 धावांवर बांगला देशचे तीन प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. सलामीवीरांसह आघाडीची फळी कोसळल्याने बांगला देश संघ मोठ्या संकटात सापडला होता. तथापि, यानंतर मैदानात उतरलेल्या अनुभवी मुशफिकूर रहिमने कर्णधार नजमूल शांटोच्या साथीने संघाचा डाव सावरला. शिवाय, धावसंख्येला उत्तम आकारही दिला.

शांटोने सुरुवातीपासूनच सकारात्मक आणि आक्रमक पवित्रा घेतला. तिसरा गडी बाद झाला तेव्हा तो स्वतः केवळ तीन चेंडू खेळला होता; परंतु त्याने आपल्या सहाव्याच चेंडूवर पदार्पण करणार्‍या थरिंदू रथनायकेला डोक्यावरून षटकार खेचत आपले मनसुबे स्पष्ट केले. मुशफिकूरनेही आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत शांटोला उत्तम साथ दिली. या जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता मैदानाच्या चारही बाजूंना सुरेख फटकेबाजी केली. दोघांनीही आपापली वैयक्तिक शतके पूर्ण करत संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले.

श्रीलंकेच्या गोलंदाजांना या जोडीसमोर फारसे यश मिळाले नाही. वेगवान गोलंदाज मिलन रथनायकेने 12 षटकांत केवळ 19 धावा देत अत्यंत किफायती मारा केला; मात्र त्याला दुसर्‍या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या आणि पदार्पण करणारा थरिंदू रथनायके यांनी सर्वाधिक षटके टाकली; पण ते प्रभावी ठरू शकले नाहीत. असिथा फर्नांडो आणि थरिंदू यांनी सुरुवातीला बळी मिळवले होते. मात्र, शांटो आणि मुशफिकूर यांनी जम बसवल्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांना विकेटसाठी झगडावे लागले. यजमानांनी गोलंदाजीतील बदलांमध्ये आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या काही चुकांचाही बांगला देशच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT