दरबान : ‘बेबी एबी’ म्हणून ओळखल्या जाणार्या डेवाल्ड ब्रेविसच्या (56 चेंडूंत 12 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांसह नाबाद 125) वादळी शतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसर्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 53 धावांनी दणदणीत पराभव केला.
ब्रेविसच्या या खेळीमुळे आफ्रिकेने 218 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 165 धावांवर गारद झाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता शनिवारी होणारा तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची अवस्था नाजूक असताना चौथ्या क्रमांकावर आलेल्या डेवाल्ड ब्रेविसने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवत नाबाद 125 धावांची वादळी खेळी केली. यामुळे आफ्रिकेने 20 षटकांत 7 बाद 218 धावांपर्यंत मजल मारली.
219 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यांचा निम्मा संघ 112 धावांत तंबूत परतला होता. सलामीवीर टीम डेव्हिडने 24 चेंडूंत 50 धावा करत एकाकी झुंज दिली; पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉश आणि क्वेना म्फाका यांनी प्रत्येकी 3 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
द. आफ्रिका : 20 षटकांत 7 बाद 218 (ब्रेविस 56 चेंडूंत नाबाद 125). ऑस्ट्रेलिया : 17.4 षटकात सर्वबाद 165. (टीम डेव्हिड 50. क्वेना 3/57).