Quinton de Kock reverses ODI retirement ahead of Pakistan series
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक याने क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या ३२ वर्षीय खेळाडूने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्याने २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमधून, तर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर ५० षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही.
दोन वर्षांनंतर, डी कॉकने आपला निर्णय बदलून टी-२० सोबतच एकदिवसीय क्रिकेटही खेळण्यासाठी संमती दर्शवली आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यासाठी त्याची दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ११ ऑक्टोबर रोजी नामिबियाविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी-२० सामन्यासाठीही तो संघाचा भाग असणार आहे.
डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी १५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५.७४ च्या सरासरीने 6,770 धावा केल्या आहेत. यात २१ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ५४ कसोटी आणि ९२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने ३८.८२ च्या सरासरीने ३,३०० धावा केल्या आहेत, ज्यात ६ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डी कॉकच्या नावावर ३१.५१1 च्या सरासरीने २,५८४ धावा आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने १ शतक आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.
द. आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यात १२ ऑक्टोबर रोजी लाहोर येथे यजमान संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळेल. त्यानंतर, दुसरा कसोटी सामना २० ऑक्टोबर रोजी रावळपिंडी येथे होईल. टेम्बा बावुमा दुखापतीमुळे कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नाही. इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. कसोटी मालिकेसाठी बावुमाच्या अनुपस्थितीत मार्कराम संघाचे नेतृत्व करेल.
कसोटी मालिकेनंतर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाईल. २८ ऑक्टोबर रोजी टी२० मालिका सुरू होईल. दुसरा टी२० सामना ३१ ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना १ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. एकदिवसीय मालिका ४, ६ आणि ८ नोव्हेंबर रोजी खेळवली जाईल.