

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय अंडर-१९ संघाने ७ विकेट्सनी शानदार विजय मिळवला. यष्टीरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडूच्या नाबाद ८७ धावा आणि वेदांत त्रिवेदीच्या नाबाद ६१ धावांच्या जोरावर, भारताने ३०.३ षटकांत २२६ धावांचे लक्ष्य गाठले. तथापि, पॉवर-हिटिंग फलंदाज वैभव सूर्यवंशीने २२ चेंडूत ३८ धावा करत लक्षवेधी कामगिरी नोंदवली.
भारतीय अंडर-१९ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. रविवारी (२१ सप्टेंबर) उभय संघामधील वनडे मालिका सुरू झाली. ब्रिस्बेनमधील इयान हिली ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत यजमान संघाला ९ बाद २२५ धावांवर रोखले. भारतीय गोलंदाजांमध्ये हेनिल पटेलने तीन बळी घेतले. किशन कुमार आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. आरएस अंबरीशनेही एक बळी घेतला.
वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियातही त्याची क्षमता दाखवून दिली. त्यची ही खेळी चर्चेचा विषय बनली आहे. या १४ वर्षीय डावखु-या फलंदाजाने ब्रिस्बेनमधील इयान हिली ओव्हल मैदानावर फक्त २२ चेंडूत ३८ धावा फटकावल्या. त्याने मैदानावर थोड्या वेळासाठी उभा राहून सात चौकार आणि एक षटकार ठोकला. सूर्यवंशी सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हेडन शिलरने पाचव्या षटकात त्याचा डाव संपवला.
वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी भारताच्या २२६ धावांच्या पाठलागाची सुरुवात धमाकेदार केली. पहिल्याच चेंडूवर चौकार मारून वैभवने इरादे स्पष्ट केले. त्याने पहिल्याच षटकात दोन चौकार मारले. त्यानंतर तिसऱ्या षटकात देखील तीन शानदार चौकार मारले. तर चौथ्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. वैभवच्या या स्फोटक खेळीने ऑस्ट्रेलियन संघात घबराट निर्माण झाली. चौथ्या षटकाच्या अखेरीस, वैभवने फक्त २२ चेंडूत ३८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज हेडन शिलर पाचवे षटक टाकण्यासाठी आला. कर्णधार आयुष म्हात्रेने षटकातील पहिल्या पाच चेंडूंचा सामना केला. नंतर वैभवला स्ट्राईक सोपवले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेडन शिलरने एक शानदार चेंडू टाकला आणि वैभव सूर्यवंशीला बाद केले.
१० व्या षटकात वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर आयुष म्हात्रे (६) आणि विहान मल्होत्रा (९) हेही जटपट माघारी परतले. यावेळी भारताची धावासंख्या ३ बाद ७५ होती. तथापि, वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू यांनी संघाला विजयाच्या मार्गावर आणले. त्यांनी एक मजबूत भागीदारी रचली, ज्यामुळे भारतीय ड्रेसिंग रूममधील तणाव कमी झाला. भारताने अखेर सात विकेट्स आणि ११७ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. वेदांत आणि अभिज्ञान हे अनुक्रमे ६१ आणि ८७ धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉन जेम्सच्या ६८ चेंडूत नाबाद ७७ धावांच्या खेळीमुळे यजमान संघाने ५० षटकांत ९ बाद २२५ धावा केल्या. भारताकडून हेनिल पटेलने तीन बळी घेतले, तर किशन कुमार आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
१४ वर्षीय वैभवने २२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार मारत ३८ धावांची जलद खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट १७२.७३ होता. तो फक्त २४ मिनिटे क्रीजवर होता, परंतु त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या सामन्यात वैभवची फलंदाजी प्रभावी नसली तरी, त्याच्याकडे अजूनही त्याची प्रतिभा दाखविण्याची उत्तम संधी आहे. वनडे मालिकेतील पुढील दोन सामन्यांमध्ये त्याला मोठी खेळी करण्याची उत्तम संधी असेल.
वैभव अलिकडच्या काळात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने प्रथम आयपीएलमध्ये आणि नंतर भारतीय अंडर-१९ संघासाठी त्याच्या स्फोटक कामगिरीने लक्ष वेधले आहे. तो आता ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच दौऱ्यावर आहे, जिथे त्याची फलंदाजीची क्षमता पहिल्याच सामन्यातून दिसून येत आहे. यापूर्वी, वैभवने इंग्लंड दौऱ्यात अंडर-१९ संघासाठी पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये ७१ च्या सरासरीने ३५५ धावा फ़तकावल्या होत्या. त्या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यानंतर त्याने एकमेव अनौपचारिक दोन कसोटीत सामन्यांत चार डावांमध्ये ९० धावा केल्या होत्या.
१४ व्या वर्षी वैभव आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केले. या संघासाठी वैभवने २०२५ च्या आयपीएलमध्ये सात सामन्यांमध्ये ३६ च्या सरासरीने आणि २०६.५५ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या. वैभवने आयपीएलमध्ये एक शतकही ठोकले.