South Africa coach Grovel remark meaning
गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या कसोटी मालिके दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी वापरलेल्या शब्द चर्चेचा विषय ठरला आहे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कॉनराड म्हणाले होते की, त्यांच्या संघाचा हेतू भारताला "ग्रोव्हल" (Grovel) करणे आहे. तसा क्रिकेटच्या शब्दकोशात हा शब्द सर्वसाधरण आहे; पण या शब्दाला वांशिक आणि सांस्कृतिक अपमानाचा इतिहास आहे. यामुळेच वाद निर्माण झाला असून माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे, चेतेश्वर पुजारा यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू डेल स्टेन यांनीही कॉनराड यांच्या विधानावर टीका केली आहे. जाणून घेवूया या शब्दाचा वादग्रस्त इतिहास...
भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे झाला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर ५४८ धावांची आघाडी घेत डाव घोषित केला. चौथ्या दिवशी भारताने खेळण्यापूर्वी दोन विकेट गमावल्या आणि शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी ५२२ धावांचे अशक्य आव्हान समोर ठेवले. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कॉनराड म्हणाले, "आम्हाला भारत मैदानावर थकून जावे असे वाटत होते. आम्हाला सामना पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर काढायचा होता. आमच्या संघाचा हेतॅन भारताला ग्रोव्हल करणे आहे. मी हा शब्द इंग्लंडचे दिवंगत कर्णधार टोनी ग्रेग यांच्या प्रसिद्ध मुलाखतीतून चोरत आहे. त्यांनी १९७६ मध्ये क्लाइव्ह लॉईडच्या वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या मालिकेपूर्वी दिला होता. ग्रेगच्या संघाने ती मालिका ०-३ अशी गमावली होती. ग्रोव्हल शब्दामुळे अनेकांनी कॉनराड यांच्यावर टीका केली.
ग्रोव्हल या शब्दाचा अर्थ गुडघ्यावर डोके टेकवून रांगणे किंवा जमिनीवर तोंड टेकून झोपणे असा अर्थ होतो. तथापि, क्रिकेट इतिहासात तो वंशवाद आणि गुलामगिरीच्या वेदनेशी जोडलेला आहे, विशेषतः कृष्णवर्णीय खेळाडूंच्या संदर्भात वापरला गेला. दक्षिण आफ्रिकन वंशाचा एक श्वेतवर्णीय क्रिकेटपटू ग्रेगने हा शब्द वर्णभेद दक्षिण आफ्रिका आणि कॅरिबियनमधील खेळाडूंच्या संदर्भात वापरला होता. या खेळाडूचा गुलामगिरीची वेदना अनुभवली होती. वंशवाद आणि गुलामगिरीच्या वेदनेशी जोडलेला असल्याने ग्रोव्हल शब्दप्रयोग आक्षेपार्ह मानला जातो.
तसेच हा शब्द चर्चेत आला तो १९७६ मध्ये. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेत मोठे झालेले इंग्लंडचे कर्णधार टोनी ग्रेग यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, "वेस्ट इंडिज संघाला ग्रोव्हल करावे अशी माझी इच्छा आहे." हे विधान कृष्णवर्णीय खेळाडूंसाठी गुलामगिरी आणि गुलामगिरीच्या भाषेसारखे मानले जात होते. यावेळी वेस्ट इंडिजचे कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांनी इशारा दिला होता की, ग्रोव्हल हा शब्द कोणत्याही कृष्णवर्णीय व्यक्तीचे रक्त उकळण्यासाठी पुरेसा आहे." त्यानंतर, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी इंग्लंडला हरवत मालिका ३-० ने जिंकली आणि सामन्यादरम्यान ग्रेगने विनोदाने गुडघे टेकून प्रेक्षकांची माफी मागितली होती.
दक्षिण आफ्रिकेला वांशिक भेदभाव आणि वर्णभेदाचा इतिहास आहे. म्हणूनच, त्याच देशातील प्रशिक्षकाने या शब्दाचा वापर अनेकांना असंवेदनशील आणि अनावश्यक वाटला. क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की, जरी अपमान करण्याचा हेतू नसला तरी, या शब्दाचा इतिहास इतका वादग्रस्त आहे की तो उच्चारणे देखील चिथावणीखोर मानले जाईल.
यावर पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी अनिल कुंबळे म्हणाले की, "जेव्हा तुमचा संघ जागतिक कसोटी विजेता असतो आणि कोणत्याही कसोटीत मजबूत स्थितीत असतो तेव्हा अशी वादग्रस्त विधाने टाळली पाहिजेत. ऐतिहासिक विजयाच्या जवळ असताना अशी हास्यास्पद विधाने आणि शब्द वापरू नयेत. ग्रोव्हल हा शब्द इतिहास जोडलेला आहे. पन्नास वर्षांपूर्वी, इंग्लंडच्या एका कर्णधाराने वेस्ट इंडिजच्या महान संघाविरुद्ध हाच शब्द वापरला होता आणि त्यानंतर काय घडले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हा तुम्ही जिंकत असता तेव्हा तुम्ही सर्वप्रथम नम्र असले पाहिजे, पत्रकार परिषदेत अशा गोष्टी बोलू नयेत. कॉनराड संघाऐवजी स्वतःला चर्चेत आणू इच्छित होता." दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू डेल स्टेन म्हणाले की,मी कॉनराडच्या विधानाशी असहमत आहे आणि त्यावर टीका करतो. पाचव्या दिवसाच्या खेळापूर्वी पुजारा म्हणाला, "अशा प्रकारची चर्चा दुखावते. मला वाटत नाही की ड्रेसिंग रूममधील कोणालाही ते आवडले असेल. सर्वोत्तम उत्तर शब्दांनी नाही तर मैदानावरील कामगिरीने आहे. आपण या परिस्थितीत आहोत कारण आपण चांगले क्रिकेट खेळलो नाही आणि आता आपल्याला शब्दांनी नाही तर बॅटने उत्तर द्यावे लागेल."