Sourav Ganguly Return To Indian Cricket
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेट प्रशासनात परतण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी (दि.२२) होणाऱ्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) वार्षिक सर्वसाधारण सभेतअध्यक्षपदी निवडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीगच्या चौथ्या हंगामासाठी प्रिटोरिया कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही गांगुलीची नियुक्ती झाली आहे. २६ डिसेंबर ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत त्याला प्रशासकीय आणि प्रशिक्षक या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधावे लागणार आहे.
मागील काही महिन्यांपासून क्रिकेट आर्थिक अनियमितता आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यांवरून असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) वर टीका होत आहे. आता या असोसिएशनमध्ये गांगुलीसह बाबलू कोलाय (सचिव), मदन मोहन घोष (सह-सचिव), संजय दास (कोषाध्यक्ष) आणि अनू दत्ता (उपाध्यक्ष) यांचा समावेश आहे. त्यामुळे अध्यक्षपदी सौरव गांगुलीची बिनविरोध निवडून येणार असे मानले जात आहे. आता सौरव गांगुली त्याचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुली याची जागा घेणार आहे. लोढा समितीच्या निर्देशानुसार सहा वर्षांची मर्यादा पूर्ण झाल्याने स्नेहाशीषला यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते.
अलीकडील काळात कॅबच्या प्रतिमेला अनेक वादांमुळे धक्का बसला आहे. याशिवाय, बंगालच्या रणजी संघाची कामगिरीही समाधानकारक नाही. नुकतेच, वित्त समितीचे सदस्य सुब्रता सहा यांना 'हितसंबंधांचा संघर्ष' (Conflict of Interest) प्रकरणी दोषी आढळल्याने २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच उपसमितीच्या कामकाजातून वगळण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकरणी कॅबलाही दंड झाला. यापूर्वी, ऑगस्टमध्ये सह-सचिव देबब्रता दास यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. या सर्व प्रकरणांवर गांगुलीने १४ सप्टेंबर रोजी री उमेदवारी अर्ज भरताना म्हटलं होतं की, “प्रत्येक संस्थेला काही समस्यांना तोंड द्यावे लागते. भविष्यात अशा काही अडचणी आल्यास त्या योग्य पद्धतीने हाताळल्या जातील.”
बंगालमधील प्रथम श्रेणी क्रिकेट मजबूत करणे, बंगाल प्रो टी२० लीगला चालना देणे, महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि तळागाळात क्रिकेटचा पाया मजबूत करण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे. मी आमच्या रणजी खेळाडूंशी बोलण्याचा प्रयत्न करेन. संघात खूप जास्त लोक असून उपयोग नाही. शेवटी खेळाडूंचे कौशल्य महत्त्वाचे असते. एक प्रशासक म्हणून, त्यांना सर्वोत्तम मदत देण्याचे काम मी करेन आणि ते नक्कीच करेन, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
गांगुलीच्या पहिल्या मोठ्या जबाबदाऱ्यांपैकी एक म्हणजे १४ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीचे आयोजन. २०१९ मध्ये ऐतिहासिक ‘पिंक-बॉल’ कसोटीनंतर या मैदानावरील ही पहिलीच कसोटी असेल. गांगुलीने बीसीसीआय अध्यक्ष असताना घेतलेला ‘पिंक-बॉल’ कसोटीचा निर्णय हा त्याच्या प्रमुख कामगिरींपैकी एक मानला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यांचे, ज्यात एक उपांत्य फेरीचा सामना असेल, यजमानपदही ईडन गार्डन्सला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, रोजर बिन्नीने वयाची अट पूर्ण केल्याने बीसीसीआय अध्यक्षपदावरुन पायउतार झाले आहेत. यानंतर आता राष्ट्रीय संस्थेच्या सत्ताकेंद्रांमध्ये गांगुलीची उपस्थिती पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण ठरू शकते असे मानले जात आहे.