

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून सौरव गांगुली हे 'आयसीसी'चे अध्यक्ष तर जय शहा हे 'बीसीसीआय'चे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. आता सौरव गांगुली यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'आयसीसी'चा अध्यक्ष होणे ही माझ्या हातातील गोष्ट नाही, असे सौरव गांगुली म्हणाले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील अध्यक्ष नोव्हेंबर महिन्यात निवडण्यास मंजूरी दिली होती. विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ या वर्षी संपणार आहे. बर्मिंघममध्ये झालेल्या बैठकीत सामान्य बहुमताने अध्यक्षपदाची ही निवडणूक होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुढील अध्यक्षांचा कार्यकाळ डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२४ असा असणार आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा जोर होत होती. (ICC Chairmanship)
भारतीय संघ गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही. यावर सौरव गांगुली यांनी चिंता व्यक्त केली आहे. सौरव गांगुली म्हणाले की, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत ८० टक्के सामने जिंकत आला आहे. भारताला गेल्या तीन-चार सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. पण तत्पूर्वी झालेल्या ३५-४० सामन्यांमध्ये फक्त ५ किंवा ६ सामन्यांमध्ये भारताने पराभव पत्करला आहे. पुढे बोलताना गांगुली म्हणाले की, मला वाटते की रोहित शर्मा आणि राहुल द्रविड हे आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही, म्हणून चिंतेत असतील यावर चर्चाही होईल. (ICC Chairmanship)
विराट कोहलीने अफगानिस्तान विरूद्ध झळकावलेल्या शतकाबद्दलही सौरव गांगुली यांनी मत व्यक्त केले. विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. मला विश्वास आहे की, विराट त्याच्या या कामगिरीत सातत्य ठेवेल, असे सौरव गांगुली म्हणाले आहेत. भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. गांगुली यांनी झूलनचा उल्लेख 'लेजंड' असा केला आहे. तिचे करियर शानदार आहे. झूलन महिला क्रिकेटसाठी रोलमॉडेल राहिल, असेही यावेळी बोलताना गांगुली म्हणाले. (ICC Chairmanship)