कोलंबो : श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा याने कोलंबो कसोटीत आपल्या फलंदाजीच्या जोरावर नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग दुसरे शतक झळकावून त्याने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. कसोटीच्या अखेरच्या दिवशी चहापानापर्यंत दिनुशा ९८ धावांवर नाबाद खेळत होता. त्यानंतर तिसऱ्या सत्रात मैदानात उतरताच अवघ्या २ धावांची भर घालत त्याने १९६ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. यासह त्याने दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत तिसऱ्या शतकाची नोंद केली आहे.
मालिकेतील गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही सोनलने शानदार शतक झळकावले होते. आता दुसऱ्या कसोटीतही सलग शतकी खेळी साकारत त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका सुवर्ण अध्यायाची नोंद केली आहे. कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावताच, भारताविरुद्धच्या आपल्या कारकिर्दीतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तब्बल तीन शतके ठोकणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नव्हती.
गॉल कसोटीच्या पहिल्या डावात १०० आणि दुसऱ्या डावात ८४ धावांची खेळी करणाऱ्या सोनलने कोलंबो कसोटीतही आपली अप्रतिम लय कायम राखली. कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात त्याने २२३ चेंडूंत १०३ धावांची खेळी साकारली होती आणि त्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद शतकी खेळी करत नवा विक्रम आपल्या नावे केला. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दिनुशा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून, त्याने ४ डावांमध्ये तब्बल ३८७ धावा कुटल्या आहेत.
याच सामन्यादरम्यान अर्धशतक गाठताच सोनलच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली. भारताविरुद्धच्या कारकिर्दीतील पहिल्या चारही कसोटी डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ६७ वर्षांनंतर अशा विक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे. यापूर्वी १९५९ मध्ये इंग्लंडच्या केन बॅरिंग्टन यांनी भारताविरुद्ध आपल्या पहिल्या चार डावांत पन्नासहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता. त्याआधी इंग्लंडचे डग्लस जार्डिन (१९३२ ते १९३४), वेस्ट इंडिजचे एव्हर्टन वीक्स (१९४८) आणि क्लाइव्ह वॉलकॉट (१९४८) यांनी अशी कामगिरी नोंदवली होती; आता २०२६ मध्ये सोनल दिनुशा या दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
या ऐतिहासिक खेळीसह सोनल दिनुशा भारताविरुद्धच्या एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतके झळकावणारा श्रीलंकेचा तिसरा फलंदाज ठरला आहे. तब्बल २९ वर्षांनंतर श्रीलंकेच्या फलंदाजाकडून असा पराक्रम पाहायला मिळाला आहे. याआधी १९८२ मध्ये चेन्नई कसोटीत दुलिप मेंडिस यांनी (१०५ व १०५) आणि १९९७ मध्ये कोलंबोच्या मैदानावर अरविंद डी सिल्वा यांनी (१४६ व १२०) अशी दुहेरी शतकी कामगिरी केली होती. आता कोलंबोच्या याच मैदानावर पहिल्या डावात १०३ आणि दुसऱ्या डावात नाबाद १०० धावांची खेळी करत सोनलने हा अनोखा बहुमान संपादन केला आहे.