Rohit Sharma s statement about his future path about odi cricket
नवी दिल्ली : रोहित शर्मा टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, त्यामुळे तो आणखी किती काळ वन डे क्रिकेट खेळणार, याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. भारताने मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर रोहित वन डे क्रिकेटमधूनही निवृत्त होईल, अशी चर्चा यापूर्वी झडली खरी, पण तसे झाले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द रोहितनेच या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
ज्या दिवशी वाटेल की, आपण आणखी क्रिकेट खेळू शकणार नाही, त्या दिवशी आताप्रमाणेच स्वत:हून वन डे क्रिकेटमधूनही निवृत्त होईन, असे रोहित याप्रसंगी म्हणाला.
अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले रोहित व विराट हे दोघेही 2027 च्या वन डे वर्ल्ड कपसाठी खेळण्याचा विचार करत आहेत, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. सुनील गावसकर यांनी मात्र हे दोघेही विश्वचषकात खेळू शकणार नाहीत, असे यापूर्वी म्हटले होते.
यापूर्वी वनडे क्रिकेट प्रकारात 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता आणि ‘हिटमॅन’ रोहित पुढील वर्ल्डकप जिंकून आपल्या कारकिर्दीची सर्वोच्च शिखरावर सांगता करू इच्छितो, असे म्हटले जाते.
रोहित याबाबत पुढे बोलताना म्हणतो, ‘पूर्वी मी माझ्या शैलीत खेळायचो. मी माझा वेळ घेत होतो. आधी मी सुरुवातीच्या 10 षटकांत 30 चेंडू खेळून फक्त 10 धावा करत असे, पण आता जर मी 20 चेंडू खेळतो, तर मी 30, 35 किंवा 40 धावाही सहज करू शकतो. ज्या दिवशी माझी लय लागते, त्या दिवशी पहिल्या 10 षटकांत 80 धावा काढणेही फारसे कठीण असत नाही. आता मी अशाच पद्धतीने विचार करतो.’
मी काहीही गृहीत धरून चालत नाही. असं नाही की मी नेहमीप्रमाणे 20-30 धावा करत राहीन आणि खेळतच राहीन. ज्या दिवशी मला असं वाटेल की मी माझं अपेक्षित काम मैदानावर करू शकत नाही, त्या दिवशी मी क्रिकेट खेळणं थांबवीन हे नक्की. पण आता तरी मला खात्री आहे की मी जे काही करत आहे, ते संघासाठी निश्चितच उपयुक्त स्वरूपाचे आहे, याचा रोहितने पुढे उल्लेख केला.
67 कसोटी सामने : 4301 धावा : 40.57 सरासरी : 12 शतके : 18 अर्धशतके : 212 सर्वोच्च धावसंख्या
273 वन डे सामने : 11168 धावा : 48.76 सरासरी : 32 शतके : 58 अर्धशतके : 264 सर्वोच्च धावसंख्या
159 टी-20 सामने : 4231 धावा : 32.05 सरासरी : 5 शतके : 32 अर्धशतके : नाबाद 121 सर्वोच्च धावसंख्या
129 प्रथमश्रेणी सामने : 9318 धावा : 49.04 सरासरी : 29 शतके : 38 अर्धशतके : नाबाद 309 सर्वोच्च धावसंख्या