

Olympic Medalist Neeraj Chopra honored as lieutenant colonel in Indian Army
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राला (Neeraj Chopra) भारतीय सैन्यात मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्याला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. नीरज हा भालाफेकमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने टोकियो ऑलिंपिक 2021 मध्ये सर्वात लांब भालाफेक करत भारतासाठी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. आता त्याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदी बढती देण्यात आली आहे.
टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर निरज प्रसिद्धीच्या झोतात आला. 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्येही त्याने रौप्य पदक जिंकले होते.
नीरजचा समावेश भारताच्या टेरिटोरियल आर्मी नियमन, 1948 च्या पॅरा-31 अंतर्गत करण्यात आला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निरजला लेफ्टनंट कर्नलची पदवी प्रदान केली आहे. यापूर्वी नीरज राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर होता. त्याआधी तो 2016 मध्ये नायब सुभेदार म्हणून भारतीय सैन्यात सामील झाला होता.
अलिकडेच नीरज चोप्रा याने पहलगाम हल्ल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, यात नीरज चोप्राही मागे नव्हता. सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करुन त्याने म्हटले होते की, ‘जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद हल्ल्याने मन दुखावले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.’
पुढील आठवड्यात बेंगळुरूमध्ये होणारा एनसी क्लासिक पुढे ढकलण्यात आल्यानंतर नीरज चोप्रा 23 मे रोजी पोलंडमधील चोरझो येथे होणाऱ्या 71 व्या ऑर्लेन जानूझ कुसोझिन्स्की मेमोरियल कार्यक्रमात भाग घेईल.