Shubman Gill Sanju Samson Controversy: अहमदाबादमध्ये ८ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या टी २० वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये भारतानं न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला होता. या विजयानंतर टीम इंडियाने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर जल्लोष केला. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या वर्ल्डकप ट्रॉफीसह केलेल्या जल्लोषातील एक फोटो सध्या व्हायरल होत असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. भारताचा स्टार फलंदाज आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलने भारतीय संघाचा ट्रॉफीसह जल्लोष करतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.
मात्र चाहत्यांना हा फोटो खटकला. हा फोटो एडिट केला गेला आहे का अशी विचारणा शुभमन गिलच्या कमेंट बॉक्समध्ये होऊ लागली. या फोटमध्ये एडिट करून संजू सॅमसनला फोटोतून हटवण्यात आलं का असं चाहते विचारत आहेत.
एका युजरने लिहिलं की संजू सॅमसनला गायब करायला कोणतं अॅप वापरलंस? अत्यंत शिताफीनं हे केलं गेलं आहे. दुसऱ्या युजरने टोमणा मारत फर्स्ट क्लास क्रिकेटर विरूद्ध फर्स्ट क्लास एडिटर अशी कमेंट केली.
काही चाहत्यांनी वर्ल्डकप जिंकण्यात संजूचा सिंहाचा वाटा आहे. त्याला फोटोतून हटवणं योग्य नाही अशा आशयाच्या कमेंट केल्या.
मात्र नेटकरी जो दावा करत आहेत त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. फोटो एडिट केला गेला आहे की नाही याबाबत कोणती माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या फोटोतील अनेक लोकं ही मागच्या बाजूला असल्यानं ते स्पष्टपणे दिसत नाहीयेत. गिलनं शेअर केलेल्या फोटोत एकूण १४ खेळाडू दिसत आहेत. त्यातील तीन ते चार जणांचे चेहरे दिसत नाहीयेत. त्यामुळं गिलनं एडिट करून संजूचा फोटो हटवला या दाव्याला कोणताही आधार दिसत नाही.
संजू सॅमसनने यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये ५ सामन्यात ३२१ धावा केल्या होत्या. भारताच्या वर्ल्डकप विजयात त्यानं सिंहाचा वाटा उचलला होता. दुसरीकडं वनडे आणि कसोटीचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलला या संघात स्थान मिळालं नव्हतं.