IPL 2026 KKR vs PBKS pudhari
स्पोर्ट्स

IPL 2026 KKR vs PBKS: दिला एक पॉईंट... पंजाबींचे ह्रदय खूप मोठे म्हणत श्रेयस अय्यरच्या बहिणीने केकेआरची चांगलीच खेचली

Anirudha Sankpal

IPL 2026 KKR vs PBKS: आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना जरी वॉश आऊट झाला असला तरी मैदनाबाहेरच्या हलक्या फुलके क्षण स्मरणात राहिले. श्रेयस अय्यरची बहीण श्रेस्ता अय्यरच्या अशाच एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

श्रेयस अय्यरची बहीण श्रेस्ताने एका विनोदी रील इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा रील लगेचच व्हायरल झाला. या क्लीपमध्ये श्रेस्ता विनोदाने म्हणते की, 'साडे पंजाबियान दा दिल वड्डा हुंदा हैं, लो दे दिया एक पॉईंट.' श्रेस्ता आपल्या रीलमधून पंजाबने मोठ्या मनाने वॉश आऊटनंतर एक पॉईंट केकेआरला दिला असं म्हटलं आहे.

मैदानावरील घडामोडींबाबत बोलायचं झालं तर पावसामुळं निराशा झाली. आधी पाऊस त्यानंतर ओलं मैदान यामुळं दोन्ही संघ डग आऊटमध्येच बसून होते. ज्यावेळी सामना थांबला त्यावेळी केकेआरने ३.४ षटकात २ बाद २५ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर एकही चेंडू टाकण्यात आला नाही. अखेर सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर पंजाब किंग्ज आणि केकेआरला नियमानुसार एक एक पॉईंट देण्यात आला. या एका गुणाचा पंजाब किंग्जला गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचण्यास मदत झाली. त्यांचे आता तीन सामन्यात पाच गुण झाले आहेत. त्यांनी हंगामाची धडाकेबाज सुरूवात केली आहे. दुसरीकडं केकेआरवर अखेर वरूणराजा प्रसन्न झाला असून त्यांचे या हंगामातील गुणांचे खाते उघडून दिले आहे. तीन सामने खेळणाऱ्या केकेआरच्या खात्यात फक्त एक गुणच जमा झाला आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चांगलाच उलटा पडला. त्यांचे दोन फलंदाज अवघ्या तीन षटकात बाद झाले. सामन्यापूर्वी सुनिल नारायण आणि वरूण चक्रवर्ती हे दोन फिरकीपटू दुखापतीमुळं सामना खेळणार नव्हते.

दुसरीकडं पंजाबने आपल्या वेगवान माऱ्याचा पुरेपूर वापर करून घेतला. झेव्हियर ब्रेटलेटने दोन विकेट घेत पंजाबला चांगली सुरूवात करून दिली होती. त्याने फिन अॅलन आणि कॅमरून ग्रीन यांना एकाच षटकात बाद केलं. दुसरीकडून अर्शदीप सिंगने आपल्या भेदक माऱ्याने केकेआरच्या फलंदाजांना अडचणीत आणलं होतं.

दोन फलंदाज बाद झाल्यानंतर केकेआरचा रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी क्रीजवर होते. त्यांनी केकेआरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पावसानं सुरूवात केली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं मैदाना ओलं झालं.

जरी काही काळासाठी मैदानावरील कव्हर काढण्यात आले तरी मैदान ओलं असल्यानं सामना रद्द करावा लागला. दरम्यान, सामना सुरू करण्यासाठी अनेकवेळा अंपायर्स आणि अधिकाऱ्यांनी मैदानाची पहाणी केली. सैरव गांगुली देखील यासाठी आग्रही होता. मात्र अखेर रात्री ११ वाजता सामना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या हंगामात देखील या दोन संघांचा इडन गार्डनवरील सामना पावसामुळेच रद्द झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT