

कोलकाता : वृत्तसंस्था : फलंदाजांच्या तुफान टोलेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मार्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 65 धावांनी पराभव केला. हेन्रिक क्लासेनने ठोकलेल्या धडाकेबाज अर्धशतकामुळे हैदराबादने कोलकाताच्या बालेकिल्ल्यात विजयाचा झेंडा फडकावला.
हैदराबादने या लढतीत निर्धारित षटकांत 8 बाद 226 धावांचा डोंगर उभा केला. 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव 161 धावांतच आटोपला. ‘केकेआर’कडून अंगक्रिश रघुवंशीने 52 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. हैदराबादच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर कोलकाताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले आणि 16 व्या षटकात त्यांचा डाव संपुष्टात आला.
प्रारंभी ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांचा अवघ्या 5.4 षटकांत 82 धावांचा फ्लाईंग स्टार्ट आणि हेन्रिच क्लासेनच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 226 धावांचा डोंगर रचला. हेडने 21 चेंडूंत 6 चौकार, 3 षटकारांसह 46 तर अभिषेकने 21 चेंडूंत 4 चौकार, 4 षटकारांसह 48 धावांचे योगदान दिले. याशिवाय, क्लासेनने 35 चेंडूंत 52 धावांची सर्वोच्च खेळी रचली.
‘केकेआर’ने नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि याचा हैदराबादच्या सलामीवीरांनी उत्तम लाभ घेतला. हेड व अभिषेकच्या धुवाँधार फटकेबाजीमुळे हैदराबादने या लढतीत 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 84 धावांचा विक्रम नोंदवला. अभिषेकने जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याच्या इराद्याने आक्रमक पवित्रा घेतला, तर हेडनेही त्याला पूरक खेळावर भर दिला. या दोघांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ‘केकेआर’चे गोलंदाज बरेच हतबल दिसून आले. पुढे हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार इशान किशन व अनिकेत वर्मा स्वस्तात परतले आणि हैदराबादची धावगती थोडीफार जरूर मंदावली. अचानक पडझडीनंतर एकवेळ हैदराबादची स्थिती 9.2 षटकांत 4 बाद 118 अशी होती. याचवेळी हेन्रिच क्लासेन व नितीशकुमार रेड्डी यांनी पाचव्या गड्यासाठी दमदार भागीदारी साकारत संघाची स्थिती आणखी भक्कम केली. क्लासेनच्या 52 धावांच्या खेळीत 4 चौकार, एका षटकाराचा समावेश राहिला. नितीशकुमार रेड्डीने 24 चेंडूंत 39 धावा केल्या.
वरुणचा ‘तो’ झेल आणि अभिषेकची खेळी संपुष्टात!
हैदराबादच्या डावात मुझराबानीला अभिषेक शर्माने उत्तुंग फटका लगावला होता. मात्र, डीप स्क्वेअर लेगवर तैनात वरुणने पुढे झेपावत स्वप्नवत झेल टिपला आणि यामुळे क्षणभर अभिषेकही थक्क झाला. मैदानी पंचांनी हा निर्णय तिसर्या पंचांकडे पाठवला होता. अनेकदा रिप्ले पाहिल्यानंतर अभिषेकला बाद देण्यात आले.