Shikhar Dhawan on Rohit Sharma and Virat Kohli
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आगामी २०२७ च्या विश्वचषकातील तयारीवर आपले मत मांडले आहे. एकदिवसीय सामने (ODI) कमी खेळले जात असले, तरी रोहित आणि विराटच्या अनुभवामुळे त्यांना फारसा फरक पडणार नाही, असे धवनला वाटते.
वृत्तसंस्था 'पीटीआय'शी बोलताना शिखर धवन म्हणाला की, "मी स्वतः कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात केवळ एकच फॉरमॅट खेळण्याचा अनुभव घेतला आहे. जास्त सामने न खेळल्यामुळे फलंदाजीच्या लयीवर (Rhythm) परिणाम होतो. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त एकच फॉरमॅट खेळता, तेव्हा तुमची लय नक्कीच विस्कळीत होते."
जेव्हा सामने कमी असतात, तेव्हा खेळाडू त्यांचे संपूर्ण लक्ष फिटनेस टिकवण्यावर केंद्रित करतात. मात्र, रोहित आणि विराटसारखे अनुभवी खेळाडू या आव्हानाचा सामना करण्यास सक्षम आहेत. रोहित आणि विराट अत्यंत परिपक्व खेळाडू आहेत. व्हानाचे संधीत रूपांतर कसे करायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. विराट नेहमीच फिट होता, पण रोहितने आपल्या फिटनेसमध्ये केलेली प्रगती थक्क करणारी असल्याचेही त्याने नमूद केले.
२०२७ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला पुरेसे एकदिवसीय सामने खेळायला मिळणार असल्याचे धवनने नमूद केले. "जेव्हा मी फक्त एक फॉरमॅट खेळत होतो, तेव्हा एकापाठोपाठ टी-२० विश्वचषक (२०२१ आणि २२) झाले आणि मी फक्त वनडे खेळत होतो, जे खूप कमी असायचे. मात्र, रोहित आणि विराटसाठी सामन्यांची कमतरता नसेल आणि त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे," असेही त्याने स्पष्ट केले.
रोहित शर्माने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर १४ सामन्यात ५० च्या सरासरीने ६५० धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या अलीकडच्या मालिकेत त्याची कामगिरी थोडी खालावली होती.दुसरीकडे, विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. २०२५ मध्ये त्याने १३ सामन्यात ६५.१० च्या सरासरीने ६५१ धावा केल्या, ज्यात तीन शतके होती. २०२६ च्या सुरुवातीलाही त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत ८० च्या सरासरीने २४० धावा कुटल्या आहेत. या अनुभवी जोडीचा फॉर्म आणि अनुभव पाहता, २०२७ च्या विश्वचषकासाठी भारताची तयारी भक्कम दिसत आहे.