नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी हंगामासाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान कर्णधार अजिंक्य रहाणेने गुरुवारी (दि. २१) करणधार पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली, असे वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिले आहे.
मुंबई संघासाठी दिलेल्या प्रदीर्घ आणि यशस्वी योगदानाबद्दल शार्दुलचा हा गौरव करण्यात आला आहे. २०१२ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून त्याने संघासाठी ३०० हून अधिक बळी घेतले आहेत. अलिकडच्या वर्षांत फलंदाजीतील त्याच्या सातत्यपूर्ण योगदानाने कर्णधारपदासाठी त्याचा दावा अधिक भक्कम मानला जात होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याला ४२ वेळा रणजी विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाचे २०२५-२६ हंगामासाठी कर्णधारपद मिळाले आहे.
इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय कसोटी संघाचा सदस्य असलेल्या शार्दुलला आता देशांतर्गत हंगामात आपले नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळाली आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, नव्या कर्णधाराबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी रहाणेशी सल्लामसलत करण्यात आली होती.
तत्पूर्वी, रहाणेने सोशल मीडियावरून मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. नव्या नेतृत्वाला घडवण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
रहाणेने आपल्या 'X' वरील पोस्टमध्ये म्हटंलय आहे की, ‘‘मुंबई संघाचे नेतृत्व करणे आणि विजेतेपदे जिंकणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. आगामी देशांतर्गत हंगामाच्या पार्श्वभूमीवर, मला वाटते की नव्या नेतृत्वाला घडवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि म्हणूनच मी कर्णधारपदाची जबाबदारी पुढे न सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.’’
त्याने पुढे म्हटले आहे की, ‘‘एक खेळाडू म्हणून माझे सर्वोत्तम योगदान देण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध राहीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला अधिक विजेतेपदे मिळवून देण्यासाठी माझा प्रवास सुरूच ठेवेन. आगामी हंगामासाठी मी उत्सुक आहे.’’