Sana Mir slams Shahid Afridi Pudhari
स्पोर्ट्स

Controversy |"घाणेरड्या ट्रोलिंगला शाहिद आफ्रिदीचे 'ते' विधान कारणीभूत" : पाकच्या माजी महिला क्रिकेटपटूने थेट सुनावले

सध्या पसरवले जाणारे एआय (AI) व्हिडिओ आणि खोटा प्रचार अत्यंत धोकादायक

पुढारी वृत्तसेवा

Sana Mir slams Shahid Afridi : महिला टी२० विश्वचषक २०२६ मधील पाकिस्तानचा प्रवास विजयाने संपला. संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा ३७ धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तान महिला संघाला सलग चार नामुष्‍कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे संघ साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाला. या खराब कामगिरीवर जोरदार टीका झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर, आता पाकिस्तान महिला संघाची माजी कर्णधार सना मीर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी महिला क्रिकेटपटूंना सहन कराव्या लागणाऱ्या द्वेषाचा जाहीर खुलासा केला आहे. महिला क्रिकेटपटूंबाबत होणारा लैंगिक भेदभाव आणि सोशल मीडियावरील द्वेषाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यासाठी पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या जुन्या वादग्रस्त वक्तव्यालही तिने जबाबदार धरले आहे.

काय म्‍हणाला होता शाहिद आफ्रिदी?

माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले होते की, महिलांनी क्रिकेट खेळण्याऐवजी स्वयंपाकावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आमच्या महिला खूप छान स्वयंपाक करतात. आमच्या महिलांच्या रक्तात उत्तम स्वयंपाक करणे आहे, त्यांनी त्याच गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे. जिथपर्यंत क्रिकेटचा संबंध आहे, जे कोणी त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितात, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत."

शाहिद आफ्रिदीला सुनावले खडे बोल

माजी क्रिकेटपटू सना मीरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्‍ये तिने महिला क्रिकेटपटूंविरुद्ध पसरवला जाणारा द्वेष, खोटा प्रचार आणि लैंगिक भेदभावावर उघडपणे भाष्य केले आहे. तसेच पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीलाही त्याच्या एका जुन्या विधानावरून चांगलेच सुनावले आहे.

'महिला क्रिकेटने पाकिस्तानला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले'

सना मीरने म्‍हटलं आहे की, "आयसीसी टी२० विश्वचषकाच्या चालू मोहिमेबद्दल कुठून बोलायला सुरुवात करावी, हेच समजत नाहीये. खेळाडूंच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत कामगिरीने सर्वांनाच निराश केले आहे. परंतु, पाकिस्तानमधील महिला क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ करण्याची क्षमता आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला अनेक वर्षे लागली. आम्ही टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा दोनदा पराभव केला आहे. टी२० मध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत आणि इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांनाही पराभूत केले आहे."

मानसिकता अधिक वेदनादायी

"आमचा संघ चांगल्या रँकिंगपर्यंत पोहोचला, काही खेळाडूंना 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळाले. आम्ही प्रत्येक मोठी उपलब्धी साध्य केली. संघाची रचना, देशांतर्गत क्रिकेट आणि इतर त्रुटींवर मी पूर्वीही बोलले आहे आणि पुढेही बोलत राहीन. पण ज्या गोष्टीने मला सर्वात जास्त वेदनादायी आहे, ती म्हणजे आपली मानसिकता."

...तेव्हा त्यांच्याबद्दल एक प्रकारची तुच्छतेची भावना

समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याची अपेक्षा व्‍यक्‍त करत सना मीर म्हणाली की, "जेव्हा कधी महिला किंवा मुलींचा विषय येतो, तेव्हा त्यांच्याबद्दल एक प्रकारची तुच्छतेची भावना दिसून येते. त्यांच्याकडून एखादी चूक झाली, तर त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातो. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही."

ऑस्‍ट्रेलिया क्रिकेट पुरुष संघाचे दिले उदाहरण

ऑस्ट्रेलियाचे उदाहरण देत ती म्हणाली, "आज ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे, कारण अनेक वर्षांपूर्वी तिथल्या पुरुष क्रिकेटपटूंनी आपल्या महिला खेळाडूंना समान दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यांनी क्रिकेट बोर्डाकडे महिलांच्या योगदानाचा आदर राखण्याची भूमिका घेतली होती. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियन पुरुष खेळाडूंनी तोपर्यंत नवीन करारांवर स्वाक्षरी केली नव्हती, जोपर्यंत त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही."

पुरुष संघाचा पराभव होत नाही का ?

महिला खेळाडूंना केवळ त्यांच्या लिंगामुळे लक्ष्य केले जाते, असे सना मीरने स्पष्ट केले. ती म्हणाली, "काही लोक आम्हाला पाठिंबाही देतात, परंतु अशा लोकांची संख्या मोठी आहे जे खेळाडूंना केवळ त्या महिला आहेत म्हणून लक्ष्य करतात. पुरुष संघ अशा स्पर्धा हरत नाही का? आम्ही कधी त्यांना या पद्धतीने लक्ष्य केले आहे का? आम्ही टीव्ही कार्यक्रमांमध्ये बसतो, पण कोणत्याही महिला क्रिकेट तज्ज्ञाने कधी असे म्हटले आहे का की पुरुषांनी तंदूरवर रोट्या भाजल्या पाहिजेत?", असेही सनाने शाहिद आफ्रिदिला सुनावले.

'तुम्ही महिलांकडे याच नजरेने पाहता का?'

"बोलण्याचीही एक पद्धत असते आणि महिलाही याच देशाचा भाग आहेत. तुम्ही महिलांकडे याच नजरेने पाहता का? खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्यासाठी एआय (AI) द्वारे तयार केलेले व्हिडिओ वापरले जात आहेत आणि खोटा प्रचार केला जात आहे. हीच विचारसरणी छळाला खतपाणी घालते आणि यामुळे कोणीही सुरक्षित नाही, असा इशाराही सनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT