WTC India Schedule:
दक्षिण अफ्रिकेनं भारताचा २-० असा पारभव करत व्हाईट वॉश दिला. मायदेशात झालेल्या या पराभवामुळं टीम इंडियावर आणि कोच गौतम गंभीरवर तुफान टीका होत आहे. आता हा पराभवाचा डाग पुसून काढण्यासाठी टीम इंडियाला नवीन वर्षाची वाट पहावी लागणार आहे.
दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा ४०८ धावांनी पराभव झाला. या विजयासोबतच अफ्रिकेचा संघ WTC पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर टीम इंडिया ही पाचव्या स्थानावर घसरली आहे. टीम इंडियाच्या WTC ची फायनल खेळण्याच्या स्वप्नाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दक्षिण अफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आता टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेसोबतच वनडे आणि टी २० मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड विरूद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका संपली की टीम इंडिया टी २० वर्ल्डकप २०२६ च्या तयारीला लागले. हा वर्ल्डकप फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.
यानंतर भारतीय संघ आपली पुढची कसोटी मालिका ही थेट आजपासून जवळपास ९ महिन्यांनी म्हणजे २०२६ च्या ऑगस्ट महिन्यात खेळणार आहे. भारत यावेळी श्रीलंकेसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर टीम इंडिया ही न्यूझीलंडविरूद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होईल. त्यानंतर घरच्या मैदानावर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका खेळेल. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात होणारी ही मालिका टीम इंडियाची WTC 2025/27 मधील शेवटची मालिका असणार आहे.
सध्या टीम इंडिया WTC पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियानं WTC 25-27 मध्ये आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभव झाले आहेत. १ सामना अनिर्णित राहिला आहे. भारतानं आ WTC 25-27 ची सुरूवात ही इंग्लंडविरूद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवत केली होती. त्यानंतर मायदेशात टीम इंडियानं वेस्ट इंडीजचा २-० असा पारभव केला. मात्र दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताला २-० असा व्हाईट वॉश मिळाला.
आता WTC final खेळण्यासाठी टीम इंडियाला उरलेल्या सामन्यातील जवळपास सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तरच त्यांच्या लॉर्ड्सवर WTC final खेळण्याच्या आशा पल्लवीत होतील.