
Gautam Gambhir Coach Performance: गौतमं गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा अजून एक मोठा पराभव झाला आहे. दक्षिण अफ्रिकेनं भारताला २-० अशी मात देत घरच्या मैदानावर लोळवलं. त्यानंतर आता गंभीरच्या कोचिंगवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. गंभीरच्या आतापर्यंतच्या कार्यकाळाची आणि राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्या कार्यकाळातील संघाच्या कामगिरीची सध्या तुलना होत आहे. पाहुयात कोणाची कामगिरी उजवी होती.
कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल विजेतेपद पटकावून दिल्यानंतर गौतम गंभीरचं कोच म्हणून वजन अचानक वाढलं होतं.
असं वाटलं की हा जगातील सर्वोत्तम कोच आहे आणि आता टीम इंडिया एका पाठोपाठ एक कप आपल्या खिशात टाकणार.
मात्र एकंदर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची सध्याची कामगिरी पाहता गौतमच टीम इंडियाचं गंभीर दुखणं तर झालेला नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी दिवसेंदिवस रसातळाला जात आहे. विशेष करून गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला आहे तेव्हापासून आपण एका पाठोपाठ एक नाचक्कीचे विक्रम करतोय.
आकडे पाहिले तर गौतम गंभीर कोच झाल्यापासून टीम इंडियाने आतापर्यंत सहा कसोटी मालिका खेळल्या आहेत. दोनच कसोटी मालिका जिंकता आल्या आहेत.
भारतानं मायदेशात झालेल्या बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांच्याविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. तर इंग्लंडविरूद्धची कसोटी २-२ अशी बरोबरीत सोडवली.
मात्र भारताला न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिकेविरूद्धची मायदेशातील मालिका गमवावी लागली. तर ऑस्ट्रेलियात देखील भारताचा ३-१ असा पराभव झाला.
जर आपण कसोटी क्रिकेटच्या अनुशंगाने प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या कामगिरीची तुलना राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्याशी केली तर गंभीर फार मागं असल्याचं दिसतं.
भारताचे २०१६ ते २०१९ मध्ये कसोटीत विनिंग पर्सेंटेज हे ७९ टक्के होते. या काळात भारतानं फक्त एक पराभव पाहिला. तर २०२० ते २०२४ या काळात हेच विनिंग पर्सेंटेज हे ७३ टक्के होतं. त्यावेळी ३ पराभव सहन करावे लागले. मात्र २०२४ पासून आतापर्यंत भारातचं विनिंग पर्सेंटेज हे अवघे २९ टक्के इतके आहे.