T20 World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: ...नाहीतर वर्ल्ड कप हातातून जाणार; वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियाला गंभीर इशारा

Sehwag Warns Team India: सलग चार विजय मिळवूनही टीम इंडियाच्या बॉलिंगवर प्रश्नचिन्ह कायम आहे. माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने सुपर-8 आधी इशारा देत गोलंदाजी सुधारली नाही तर ट्रॉफीचं स्वप्न तुटू शकतं, असं सांगितलं.

Rahul Shelke

Team India Super 8 Warning: सुपर-8 आधी टीम इंडिया विजयाच्या ट्रॅकवर आहे, पण आनंदाच्या या वातावरणात इशाऱ्याची घंटा वाजवली आहे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने. त्याने इशारा दिला की, जर एक चूक दुरुस्त केली नाही, तर ट्रॉफीचं स्वप्न तुटू शकतं.

भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत पोहोचला आहे. ग्रुप स्टेजमध्ये सलग चार सामने जिंकत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने दमदार कामगिरी केली. आता पुढचं आव्हान आहे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज संघाविरुद्ध. भारत सामने जिंकत आहे, त्यामुळे आपल्याला सर्व काही सुरळीत वाटत असलं, तरी सेहवाग मात्र टीम इंडियाच्या बॉलिंगवर नाराज आहेत.

एका चर्चेदरम्यान त्याने हा मुद्दा मांडला. सेहवाग म्हणाला की, भारताला आतापर्यंत फार मोठं आव्हान मिळालेलं नाही. पहिल्या सामना थोडा कठीण गेला, पण त्यानंतर संघ सहज जिंकत गेला. खरी परीक्षा सुपर-8 मध्ये सुरू होईल. “एका सामन्यात आपण 193 धावा केल्या, पण 176 धावा दिल्या आहेत. ही बाब चिंताजनक आहे. मजबूत फलंदाजी असलेल्या संघासमोर हे बॉलिंग युनिट कसं खेळणार आहे, हा खरा प्रश्न आहे,” असं सेहवागने ठामपणे सांगितलं. त्याची चिंता केवळ धावांपुरती नाही. निर्णायक क्षणी कोणाच्या हातात चेंडू असेल, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे.

याच चर्चेत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मानेही भारताच्या बॉलिंग कॉम्बिनेशनवर बोट ठेवलं. सुपर-8 मध्ये संघ नेमक्या कोणत्या प्लॅनने मैदानात उतरेल, हे अजून स्पष्ट नाही, असं तो म्हणाला. डेथ ओव्हर्समध्ये अनिश्चितता दिसून येत आहे. त्याने सांगितलं की, जर क्रमांक आठवर ऑलराउंडर असेल, तर शेवटच्या षटकांत गोलंदाजी कोण करणार? तुलनेने कमकुवत संघही डेथ ओव्हर्समध्ये धावा करत असतील, तर मोठ्या सामन्यांत अडचणी वाढू शकतात. मात्र अर्शदीप सिंग मैदानात असेल, तर संघाला थोडी लवचिकता मिळू शकते, कारण तो जसप्रीत बुमराह सोबत शेवटची षटके सांभाळू शकतो.

दरम्यान, सुपर-8 चं वेळापत्रकही निश्चित झालं आहे. भारत 22 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारीला चेन्नईत झिम्बाब्वेशी सामना होईल. सुपर-8 मधील शेवटचा सामना 1 मार्चला कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला जाणार आहे.

सलग विजयामुळे आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे, पण सेहवागचा इशारा दुर्लक्षित करता येणार नाही. सुपर-8 मध्ये प्रत्येक ओव्हर निर्णायक असेल. जर बॉलिंगमधील ही समस्या कायम राहिली, तर चांगली सुरुवात असूनही भारताचं विजेतेपदाचं स्वप्न अर्ध्यावरच थांबू शकतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT